टीम इंडियाला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव सध्या अस्वस्थ आहेत. कपिल देव यांचा जवळचा मित्र आणि टीम इंडियातील एकेकाळचे सहकारी असणारे अंशुमन गायकवाड हे सध्या गंभीर आजारी आहे. अंशुमन गायकवाड यांना ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले असून त्यांच्यावर लंडनधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मदतीसाठी आता कपिल देव यांनी आवाज उठवला असून बीसीसीआयने त्यांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि माजी कोच अंशुमन गायकवाड (वय – 71) यांना ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. त्यांच्यावर सध्या गेल्या एक वर्षापासून लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची अशी अवस्था बघून कपिल देव अस्वस्थ झाले असून त्यांनी बीसीसीआयला मदतीची गळ घातली आहे. एवढेच नाही तर गायकवाड यांच्या उपचारासाठी कपिल देव यांनी आपली पेन्शनही देऊ केली आहे.
‘स्पोर्टस स्टार’शी बोलताना कपिल देव यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. हे अतिशय दु:खद आणि वेदनादायक आहे. मी अंशुमनसोबत खेळलो असून त्याला या अवस्थेमध्ये पाहू शकत नाही. कोणावरही जबरदस्ती नाही, पण मला माहितीय की बीसीसीआय त्याची काळजी घेईल. त्याने देशासाठी खेळताना घातक गोलंदाजांचे चेंडू छातीवर झेलले आहेत. आता त्याच्यासोबत उभे राहण्याची वेळ आली आहे, असे कपिल देव म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, माजी खेळाडूंना अडचणीच्या वेळी मदत मिळेल असी तगडी यंत्रणा आपल्या देशात नाही. आज क्रिकेटपटूंना, सपोर्ट स्टाफला चांगला पैसा मिळतो. आमच्या काळात बीसीसीआयकडे पैसे नव्हते. त्यामुळे भुतकाळातील खेळाडूंची काळजी घेणे आवश्यक आहे.
पण खेळाडूंना पैसे पाठवणार कसे? एखादी ट्रस्ट असतील तर तिथे पैसे पाठवले असते. दुर्दैवाने आपल्याकडे तसी यंत्रणाच नाही. बीसीसीआय हे काम करू शकते. ते विद्यमान आणि माजी खेळाडूंचीही काळजी घेतील. कुटुंबाने परवानगी दिली तर आम्ही आमच्या पेन्शनची रक्कमी दान करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. मोहिनदर अमरनाथ, सुनील गावस्कर, संदीप पाटील. दिलीप वेंगसरकर, मदनलाल, रवी शास्त्रीआणि किर्ती आझाद हे माजी खेळाडू अंशुमन यांच्या उपाचारांसाठी मदत निधी जमा करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहितीही कपिलदेव यांनी दिली.
WCL 2024 Final : टीम इंडियाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, लीजेंड्स लीगच्या फायनलमध्ये केला दारूण पराभव
दरम्यान, अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 या काळात टीम इंडियाकडून 40 कसोटी आणि 15 एक दिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांच्या नावावर 2 शतक आणि 10 अर्धशतकांसह 1985 आणि वन डेमध्ये 269 धावांची नोंद आहे. निवृत्तीनंतर त्यांनी दोन वेगवेगळ्या कालखंडात टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले.