तेच आहेत त्यांच्या निवृत्तीचे निर्णयकार, कपिल ‘देवासारखे’ रोहित-विराटच्या पाठीशी

ऑस्ट्रेलिया दौऱयातील लाजिरवाणा पराभव आणि मालिकेतील वैयक्तिक खराब कामगिरामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली हे टीकेचे धनी बनले होते. त्यांच्यावर चोहोबाजूंनी निवृत्तीसाठी दबाव वाढला होता. अशातच आता हिंदुस्थानचे महान अष्टपैलू कपिल देवासारखे या दोघांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत. ते दोघेही मोठे खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीचा निर्णय त्यांच्यावरच सोडा, असा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला आहे.

हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलियात 4-0 ने मालिका जिंकण्याचे ध्येय डोळय़ापुढे ठेवून ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराने हिंदुस्थानला पर्थ कसोटी जिंकून देत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसऱया कसोटीपासून हिंदुस्थानच्या फलंदाजांची कामगिरी खालावत गेली. खुद्द रोहित शर्माला तीन कसोटींतील पाच डावांत केवळ 31 धावा करता आल्या, तर विराट कोहलीने 9 डावांत एका शतकासह केवळ 190 धावा केल्या. विशेष म्हणजे, विराटसारख्या महान फलंदाजाला या मालिकेत ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू खेळताच आले नाहीत. वारंवार तो त्याच चेंडूवर बाद झाला. दोघांच्या या निराशाजनक कामगिरीनंतर ऑस्ट्रेलिया दौरा हा त्यांचा समारोपाचा मानला जात होता. मालिकेत अपयशानंतर दोघे निवृत्ती जाहीर करण्याची अपेक्षा होती, पण तसे अद्याप घडलेले नाही. दोघांच्या निवृत्तीबाबत निवड समितीवरही दबाव वाढत चालला आहे. त्यातच कपिल देव यांना दोघांच्या भवितव्याबाबत छेडले असता ते म्हणाले, ‘विराट आणि रोहित हे खूप मोठे खेळाडू आहेत आणि त्यांनाच त्यांचे भवितव्य ठरवू द्या,’ असा सल्ला देत दोघांच्या निवृत्तीच्या विषयाला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला. तसेच रोहितच्या जागी कर्णधार म्हणून कुणाची निवड करावी याबाबत ते म्हणाले, यात वाद होता कामा नये. सध्याचा कर्णधारसुद्धा कुणाच्या तरी जागी आला होता. त्यामुळे जो नवा कर्णधार असेल त्याला पूर्ण वेळ मिळायला हवा.