उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅन्टोन्मेंटमधील आर्मी फार्म हाऊसशेजारी बांधलेल्या मदरशात बुधवारी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या 3 वर्षांपासून हा मदरसा बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वी अनेक मुले या मदरशात शिकत असत. बुधवारी मदरसा मालकाचा नातेवाईक असिफ घराबाहेर पोहोचला असता मागील गेटचे कुलूप तुटले होते. त्यामुळे त्यांनी आत जाऊन बघीतले तर तेथे त्यांना एका व्यकीचा सांगाडा आढळून आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून हा सांगाडा कोणाचा आहे याचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा मदरसा परवेझ नावाच्या व्यक्तीचा आहे. परवेझ यांचा मृत्यू झाला आहे. मात्र परवेज यांचा मुलगा हमजा यांच्या म्हणण्यानुसार मदरसा ३ वर्षांपूर्वी बंद झाला होता. पण बुधवारी याच्या मागच्या दाराचे कुलूप तुटलेले पाहून मी आत गेलो. जिथे स्वयंपाकघरासारख्या खोलीत एक सांगाडा पडलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर कपडेही होते असे हमाज यांनी सांगितले.
दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांना तपासात काही तृटी आढळल्या. मदरशाच्या बोर्डावर अ, ब, क, ड असे लिहिले आहे. याशिवाय 20 मे 2023 अशी तारीखही लिहिली होती. याचाच अर्थ मदरशा गेल्या वर्षापर्यत सुरू होता. त्यामुळे मदरशाच्या मालकांनी दिलेली माहिती आणि मदरशाच्या बोर्डावर असलेली माहिती यात कसलेही साम्य नाहीए. असे पोलिसांनी सांगितले.
सांगाड्याची माहिती मिळाताच पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती एसीपी अजय त्रिवेदी यांनी दिली. मदरसा कधी बंद झाला आणि हा मृतदेह येथे कसा आला, हे तपासानंतर कळेल असेही ते म्हणाले. पोलिसांनी सर्व व्हिडीओग्राफी केली आहे. प्रत्येक गोष्टीची चौकशी केली जात आहे.