हातात धारदार कोयता, डोळ्यावर गॉगल अन् टपोरी लूक; ‘बिग बॉस’ फेम रजत किशन आणि विनय गौडाला अटक, प्रकरण काय?

हातात धारदार कोयता, डोळ्यात गॉगल आणि टपोरी लूकमध्ये रिल बनवणारे ‘बिग बॉस कन्नड’ फेम रजत किशन आणि विनय गौडा अडचणीत सापडले आहेत. बसवेश्वरनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. इन्स्टाग्रामवर रिल बनवताना दोघांनीही धारदार हत्यारं हवेत फिरवत टपोरीगिरी केली होती. सुरुवातीला पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

रजत किशनने ‘बिग बॉस कन्नड’च्या अकराव्या हंगामामध्ये वाईल्ड कार्डद्वारे घरात एन्ट्री केली होती. तर विनय गौडा हा ‘बिग बॉस कन्नड-10’चा रनरअप राहिला होता. दोघांनी नुकतीच एक रील बनवली होती. यात दोघेही धारदार हत्यार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे दिसते. पाच दिवसांपूर्वी बनवलेल्या या 18 सेकंदाच्या रीलमुळे दोघे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

रजत आणि विनय सार्वजनिक ठिकाणी हत्यार घेऊन फिरत होते आणि दोघांनी शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केले. त्यामुळे दोघांनी शस्त्रास्त्र कायदा, 1959, BNS 2023 (U/s-270,r/w 3(5)) अन्वये गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती बंगळुरु पूर्वचे डीसीपी एस. गिरीश यांनी दिली.

दरम्यान, Bujji नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही रिल शेअर करण्यात आली होती. ‘जेव्हा पोरांवर संकट येते तेव्हा भाऊ हत्यार काढतो’, अशा आशयाचे कॅप्शन या रिलला देण्यात आले होते. ही रिल बनवण्यामागे सार्वजनिक ठिकाणी भीतीचे वातावरण बनवणे हा उद्देश होता, असे पोलिसांनी म्हटले आहे. यामुळे शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने दोघांनाही चौकशीला बोलावून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.