
दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव (वय – 32) हिला सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तिच्याकडून तब्बल 14.8 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. बाजारात या सोन्याची किंमत जवळपास 12 कोटी रुपये आहे.
रान्या राव ही दुबईहून सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती राजस्व आसूचना निदेशालय अर्थात डायरेक्टोरेट ऑफ रेव्हिन्यू इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. गेल्या वर्षभरात तिने 12 वेळा हिंदुस्थान ते दुबई आणि दुबई ते हिंदुस्थान प्रवास केला होता. त्यामुळे तिच्यावरील संशय बळावला होता. डीआरआयचे अधिकारी रान्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन होते. 3 मार्च रोजी ती दुबईहून बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली असता अधिकाऱ्यांनी तिची कसून तपासणी केली. यावळी कपड्यांच्या आतील भागांमध्ये सोने लपवण्याचे आढळून आले.
डीआरआय अधिकाऱ्यांनी रान्याला ताब्यात घेतले असून तिच्याकडून 14.8 किलो सोनेही जप्त केले आहे. बाजारात या सोन्याची किंमत 12 कोटी रुपयांहून अधिक आहे. रान्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
वडील पोलीस महासंचालक
रान्या राव ही कर्नाटकचे पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्याच्या आईने रामचंद्र राव यांच्याशी दुसरे लग्न केले होते. वडिलांच्या नावाचा आणि पदाचा फायदा घेत रान्याने सोन्याची तस्करी सुरू केली होती, अशी चर्चा आहे. एवढेच नाही तर तिने डीआरआयच्या अधिकाऱ्यांना वडिलांच्या नावाने धमकी देण्याचाही प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी कशाचीही तमा न बाळगता रान्याला बेड्या ठोकल्या.
लेक अभिनेत्री
रान्या राव हिने काही वर्षांपूर्वी कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 2014 मध्ये आलेल्या ‘माणिक्य’ हा तिचा सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटातच ती कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपसोबत झळकली होती, या चित्रपटामुळे तिला चांगली प्रसिद्धीही मिळाली. मात्र पुढे तिला अभिनयात काही खास करता आले नाही. त्यामुळे तिने पैसे कमावण्यासाठी आणि शौक पूर्ण करण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.