सोन्याची तस्करी करताना कन्नड अभिनेत्रीला अटक

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आणि आयपीएस रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्या राव हिला बंगळुरू विमानतळावर 14 किलोच्या सोन्याची तस्करी करताना रंगेहाथ पकडले असून तत्काळ अटक करण्यात आली. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 4.73 कोटी रुपये किंमत आहे. रान्या रावला अटक करण्यात आल्यानंतर तिला आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी तिला 14 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

रान्या राव ही डायरेक्टर ऑफ जनरल पोलीस (हाऊसिंग) रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्या अमिरातीच्या विमानाने दुबईहून बंगळुरूला परतली होती. ती सोन्याची तस्करी करत आहे, अशी माहिती अधिकाऱयांना आधीच मिळाली होती. त्यामुळे तिच्या विदेश प्रवासावर तपास अधिकाऱयांचे बारीक लक्ष होते. बंगळुरू विमानतळावरून बाहेर पडण्यापूर्वी तिला ताब्यात घेण्यात आले. त्या वेळी तिने तिच्या कपडय़ात सोने लपवल्याचे उघड झाले.