योगेश जाधव यास पंतप्रधान रिसर्च फेलोशिप प्रदान; सीतानाईक तांड्यावरील अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्याच्या मुलाचे यश

कन्नड तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी बहुल सीतानाईक तांड्यातील रहिवासी अल्पभूधारक शेतकरी पूर्णाबाई व झब्बू गोबा जाधव या दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतलेला योगेश जाधव. योगेश गोव्यातील बिटस् पिलानी कॉलेजमध्ये रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पीएच. डी. करीत असून, त्यास नुकत्याच हिंदुस्थान सरकारद्वारे पीएच. डी. साठी पंतप्रधान रिसर्च फेलोशिप प्रदान करण्यात आली. देशातील 46 पीएच. डी. करत असलेल्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान रिसर्च फेलोशिप प्रदान करण्यात आली. त्यात योगेश जाधव याचा समावेश आहे.

पुत्र ऐसा व्हावा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा या उक्तीप्रमाणे स्वकर्तुत्वावर योगेशने यशाला गवसणी घातली. त्याने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करत फिनिक्स पक्षासारखी भरारी घेत तालुक्याला त्याच्या यशाचा अभिमान वाटावा अशी पंतप्रधान रिसर्च फेलोशिप प्राप्त केली. पंतप्रधान रिसर्च फेलोशिप ही पदव्युत्तर पदवी मध्ये मिळालेल्या गुणांवर व गेट या परीक्षेच्या गुण, रिसर्च टॉपिक यावर निवड केल्या जाते यात दोन ते तीन वेळेस मुलाखती होतात व त्याच बरोबर स्क्रिनिंग चाचण्या होतात. योगेश जाधव यास पंतप्रधान रिसर्च फेलोशिप पी एच डी च्या चार वर्ष कालावधी साठी दर महिन्याला 70 हजार रुपये विद्या वेतन मिळणार आहे.

गोव्यातील बिटस् पिलानी कॉलेजमध्ये योगेशला प्रवेश मिळाला तो शहरातील जाधव नर्सिंग होमचे संचालक डॉ. सीताराम जाधव व डॉ. रविराज सीताराम जाधव यांच्या मदतीमुळे. त्यांच्या आर्थिक मदतीमुळे शक्य झाले. डॉ. सीताराम जाधव यांची योगेशच्या कुटुंबाशी कुठलीही ओळख नसताना त्याच्यात असलेली गुणवत्ता हेरून सामाजिक बांधिलकी व माणुसकी जोपासत योगेश यास विना परतफेडीची मदत केली.

पूर्णाबाई व झब्बू जाधव यांना दोन मुले व एक मुलगी. म्हणतात ना सरस्वती असली तर लक्ष्मी राहत नाही. त्यानुसार या कुटुंबात योगेश हा सर्वात मोठा. जयश्री व राजेश असे तिघे बहीण भावंडं. मुल हुशार असून आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना मुलं शिकली पाहिजे या ध्येयाने झब्बू जाधव यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. योगेश व राजेश हे बाहेरगावी शिकत असताना पालक झब्बू जाधव किंवा नातेवाईक या दोन्ही भावांच्या प्रवेशासाठी अथवा अधून-मधून त्यांना भेटण्यासाठी जाऊ शकले नाही. कारण त्यांची अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती. राजेश जाधव सुद्धा मोठ्या बंधूंच्या पावलावर पाऊल ठेवत तो सुद्धा नांदेड येथील गुरू गोविंदसिंग कॉलेज ऑफ इंजिरिंगमध्ये आयटीमध्ये शेवटच्या वर्गात शिकत आहे.

या दोन्ही भावांना डॉ. सीताराम जाधव यांची मोलाची साथ आहे. गेल्या 4 वर्षांपासून संपूर्ण फिसह शैक्षणिक खर्च करीत आहे. बहीण जयश्रीसुद्धा स्पर्धा परीक्षा तयारी करत आहे. योगेश जाधव याचे ६ वी पर्यंत शिक्षण सितानाईक तांड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 7 वी ते शहरातील सानेगुरुजी विद्यालय, डिप्लोमा रासायनिक अभियांत्रिकी एसएमआयटी जळगाव, बी टेक रासायनिक अभियांत्रिकी एमआयटी पुणे, एमई बिट्स पीलानी गोवा, पी एच डी. बीटस् पीलानी गोवा येथे करीत आहे. योगेश जाधव यास पीएच.डी. साठी अपोलो टायर्स ने दत्तक घेतलेले आहे.

योगेश जाधव यास पंतप्रधान रिसर्च फेलोशिप मिळाल्या बद्दल त्याचे मार्गदर्शक प्रोफेसर एस. डी. मांजरे, डायरेक्टर सुमन कुंडू, डॉ सीताराम जाधव, डॉ रविराज जाधव, निवृत्त मुख्याध्यापक अनंतराव मांडे, साईदास राठोड, सरस्वती क्लासेसचे संचालक विजयकुमार मांडे, गणिततज्ञ शेखर मांडे, बाजीराव राठोड, विलास राठोड, नामदेव राठोड, बाबू जाधव, भरत जाधव, अक्षय पाटील, गब्बू जाधव, प्रकाश जाधव, पंडित जाधव, कृष्णा जाधव, सैनिक राहुल राठोड, संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे तिलकचंद राठोड, देवगिरी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या जागृती शितोळे, पंडित राठोड, ग्रामसेवक चांगदेव पवार, कौस्तुभ मांडे, राजेश जाधव, नवनाथ राठोड, अर्जुन पवार, विनय मांडे, किशोर नागरे, अक्षय जाधव, प्रकाश काळे, रितेश राठोड, करण राठोड यांनी अभिनंदन केले आहे.