
काँग्रेसच्या ‘पलायन रोको-नौकरी दो’ यात्रेदरम्यान पाटण्यात जोरदार हंगामा झाला. पोलिसांनी लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा करून हे अभियान दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेस नेते कन्हैया कुमार आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभान तसेच बिहारचे प्रदेशाध्यक्ष गरीबदास यांच्यासह 30 जणांना अटक केली. कार्यकर्ते मुख्यमंत्री निवासाला घेराव घालण्यासाठी जात होते. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. कन्हैया कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आम्ही लाठीचार्ज किंवा पाण्याचा मारा यांची मागणी करत नाही. आम्हाला पाणी हवे, घरोघरी नळांना पाणी यायला हवे. ही योजना योग्यप्रकारे सुरू राहावी, अशी आमची मागणी आहे. परंतु सरकार नळांमध्ये पाणी देत नाही, तरुणांवर पाण्याचा मारा देते, असे कन्हैया कुमार म्हणाले. दरम्यान, यात्रेत सचिन पायलट यांनीही सहभाग घेतला.