कंगनाला हवा महाराष्ट्र सदनातला मुख्यमंत्र्यांचा खास कक्ष? राज्यातल्या बड्या नेत्याला केला फोन

अभिनेत्री कंगना रानावत ही हिमाचलप्रदेशमधील मंडी येथून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. सोमवारी दिल्लीत नव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले व सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. त्यासाठी अभिनेत्री कंगना रानावत देखील दिल्लीत आली होती. अद्याप कंगनाला सरकारी निवासस्थान मिळालेले नसल्याने तिच्या राहण्याची सोय महाराष्ट्र सदनात करण्यात आली होती. मात्र तिथे कंगनाने थेट मुख्यमंत्र्यांच्या खोली हवी असल्याची मागणी केली. त्यासाठी तिने सदनातूनच राज्यातील एका बड्या नेत्याला फोन केल्याची देखील चर्चा आहे.

कंगना ही अधिवेशन आणि शपथविधीसाठी दिल्लीत आली होती. सरकारी निवासस्थान नसल्याने कंगनाची सोय महाराष्ट्र सदनात केलेली होती. मात्र तिला दिलेली रुम तसेच इतरही रुम लहान असल्याने कंगनाने थेट मुख्यमंत्र्‍यांसाठी राखाीव प्रशस्त खोलीची मागणी केली. मात्र नंतर महाराष्ट्र सदनाकडून तिला मुख्यमंत्र्यांचा सूट देता येणार नाही असे कळवण्यात आले.

दरम्यान कंगनाची ही मागणी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. कंगना ही पहिल्यांदाच खासदार बनली आहे. तसा राजकारणाचा अनुभव शून्य असतानाही इतकी मिजास दाखवत असल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. तर कंगना ही हिमाचल प्रदेशमधून निवडून आलेली असत्यामुळे तिची सोय हिमाचल भवनमध्ये व्हायला हवी होती, अशीही चर्चा दिल्लीत रंगली आहे.