न्यूझीलंडचा भरवशाचा फलंदाज केन विल्यमसनचे 33 वे कसोटी शतक अवघ्या 7 धावांनी हुकले. त्याने टॉम लॅथम (47), रचिन रवींद्र (34) आणि डॅरिल मिचेल (19) यांच्याबरोबर अर्धशतकी भागी केल्यामुळे न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध सुरू झालेल्या ‘थॉर्प-क्रो करंडक’ कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 8 बाद 319 अशी समाधानकारक मजल मारली. खेळ थांबला तेव्हा फिलीप्स 41 तर साऊदी 10 धावांवर खेळत होते.
हिंदुस्थानी संघाला त्यांच्या देशात 3-0 ने धूळ चारणाऱ्या न्यूझीलंडने आज मायदेशात सुरू झालेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जोरदार सुरुवात केली. सलामीवीर डेव्हन कॉन्वे (2) लवकर बाद झाला तरी त्यानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या विल्यमसनने संयमी खेळी करताना न्यूझीलंडच्या डावाला एकहाती सावरले. त्याने पाच तास किल्ला लढवत 197 चेंडूंत 93 धावांची खेळी केली. त्याला आज 33 वे कसोटी शतक साजरे करण्याची संधी होती, पण ऍटकिन्सनने त्याची विकेट काढली. इंग्लंडकडून शोएब बशीरने 69 धावांत 4 विकेट टिपल्या.