कांदिवली सह्याद्री नगरमध्ये बेकायदा ‘दुकानदारी’मुळे रहिवासी मेटाकुटीला, वारंवार तक्रारी करूनही पालिकेचे दुर्लक्ष

कांदिवली पश्चिम चारकोप सेक्टर 1 मधील सह्याद्री नगरमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या ‘दुकानदारी’मुळे रहिवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. सह्याद्री नगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गालगत भूखंडावर रस्त्यालगत बेकायदेशीरपणे चिकन-मटण शॉप, गाडय़ा धुण्याची दुकाने, फर्निचरच्या दुकानांसह अनेक स्टॉल थाटल्याने रस्त्यावर घाण, दुर्गंधी पसरत असून परिसराला बकालपणा आला आहे. यामुळे हैराण झालेल्या रहिवाशांनी पालिकेकडे वारंवार तक्रारी करून कोणतीही कारवाई होत नसल्याने मनस्ताप वाढला आहे.

माथाडी कामगारांचा कापड बाजार म्हणून प्रसिद्ध असलेला हा 19 एकरचा भूखंड आहे. या ठिकाणी याआधी फक्त माथाडी कामगारांच्या इमारती होत्या, मात्र सद्यस्थितीत डॉ. आंबेडकर मार्गालगत मोठमोठी दुकाने थाटण्यात आली आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम नसलेल्या दुकानांमधून राजरोसपणे विविध प्रकारचे व्यवसाय सुरू आहेत. अगदी उघडय़ावर थाटलेल्या चिकन शॉपमुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, तर गाडय़ा धुण्याच्या पाण्यामुळेही प्रदूषण पसरत असल्याने रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अथर्व कॉलेजजवळ रस्ता रुंदीकरणात हटवण्यात आलेली फर्निचरची दुकानेही या ठिकाणी हलवण्यात आली आहेत. या ठिकाणचे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांमधून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याबाबत विशाल सह्याद्री संस्थेच्या संचालकांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.

बेकायदा लायटिंग, पाण्याची खैरात

पालिकेचा वॉर्ड क्र. 20 मधील या सह्याद्री नगरात उभारण्यात आलेली दुकाने कच्च्या स्वरूपातील बेकायदा असूनही या ठिकाणी लाइट आणि पाण्याची खैरात मात्र बेमालूमपणे सुरू आहे. विशेष म्हणजे सह्याद्रीनगरमधील रहिवाशांना दररोज अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असताना बेकायदा दुकानांना पाणी कुठून मिळते, असा सवाल रहिवासी करीत आहेत. या सर्व प्रकारांबाबत पालिकेकडे रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन कारवाई का करीत नाही, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.