कामिंदू मेंडिसचा ‘आठवा’ प्रताप!, सलग आठ कसोटीत अर्धशतकी खेळ्या करून घडवला इतिहास

श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसने कसोटी क्रिकेटच्या 132 वर्षांच्या इतिहासात कोणालाच जमला नाही, असा विश्वविक्रम केला. त्याने कसोटी पदार्पणानंतर सलग आठ कसोटींत अर्धशतकी खेळ्या करत कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडविला. श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवित पहिल्याच दिवशी तीनशेपार धावसंख्या उभारली.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने 90 षटकांत 3 बाद 306 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. अँजेलो मॅथ्यूज 78, तर मेंडिस 51 धावांवर खेळत होते. लंकेच्या डावात दिमुथ करुणारत्ने (46) आणि दिनेश चंडीमल (116) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागी रचली. मग चंडीमलने मॅथ्यूजबरोबर 97 धावांची भर घातली.

दोन वर्षांपूर्वी गॉल कसोटीतच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 61 धावांची खेळी करत पदार्पण करणाऱ्या कामिंदु मेंडिसने सलग आठ कसोटींत किमान अर्धशतके ठोकत नवा पराक्रम केला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या सऊद शकीलने सलग सात कसोटींत अर्धशतकी खेळी केल्या होत्या. मेंडिसने आपल्या आठ कसोटूंत 61, 102-164, ना. 92-9, 12-113, 74-5, 64, 114-13, ना. 51 अशा खेळी केल्या आहेत. त्याने आठ कसोटींत 13 डावांत 4 शतकांसह 79.80 धावांच्या सरासरीने 873 धावा केल्या आहेत.