कामिका वद्य एकादशी निमित्ताने नेवासा नगरी ज्ञानदेव, तुकाराम महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली

संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे बुधवारी दि.31 जुलै रोजी आलेल्या कामिका वद्य एकादशीच्या निमित्ताने मोठी यात्रा भरली होती. यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या “पैस” खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. “पुंडलीक वरदे…हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम”ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती. यावेळी शेकडो दिंड्यांनी माऊलींचा गजर करत हजेरी लावली होती.

बुधवारी दि.31जुलै पहाटे 4 च्या सुमारास संत ज्ञानेश्वर माऊलींच्या “पैस” खांबास वेदमंत्राचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत उदयनदादा गडाख व डॉ.सौ.निवेदिता गडाख यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या यात्रेनिमित्त श्री क्षेत्र देवगड चे श्री भास्करगिरीजी महाराज,उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज, सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत श्री उद्धव महाराज मंडलिक,नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार संभाजीराव फाटके, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,पाटील यांनी यावेळी भेट देऊन माऊलींच्या “पैस”खांबाचे दर्शन घेतले. एक किलोमीटर अंतरापर्यंत दर्शन बारी रांग लागली होती. तर मंदिर प्रांगणात आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ,पंचगंगा सिड्स कंपनी,तर मंदिर रस्त्यावर रविराज तलवार,मारूत राव घुले पाटील पतसंस्था,नागेबाबा पतसंस्था, आमदार बाळासाहेब मुरकुटे मित्र मंडळ, नरहरी मंदिर परिसरात सुवर्णकार समाज, वतीने पाणी बॉटल,शाबुदाणा खिचडी,केळीचे,चहाचे वाटप करण्यात आले.

विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली होती. आषाढी वद्य एकादशी ही माऊलींची एकादशी असल्याने नेवासा शहरासह संत ज्ञानेश्वर मंदिर रस्ते गर्दीने फुलून गेले होते. नेवासा एस टी स्टँड पासून ते ज्ञानेश्वर महाराज मंदिरापर्यंतच्या एक किलोमीटर अंतरावर गृहोपयोगी वस्तू,खेळणी,मिठाई,सौंदर्य प्रसाधने,कपडे अशा विविध प्रकारची स्टॉल थाटण्यात आली होती. या स्टॉल वरील साहित्य घेण्यासाठी महिला भाविकांची मोठी झुंबड उडाली होती