मृत कामगारांच्या कुटुंबीयांच्या दुःखावर फुंकर, दिवाळीनिमित्त भारतीय कामगार सेनेचा अभिनव उपक्रम

दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाच्या वतीने विमानतळ विभागातील मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त फराळ व आर्थिक सहाय्य देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. दिवंगत कामगारांची आठवण ठेवल्याबद्दल कुटुंबियांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली.

मृत कामगारांच्या कुटुंबीयांचे दुःख जाणून घेऊन त्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांच्या संकल्पनेतून गेली अकरा वर्षे हा उपक्रम मुंबई विमानतळ येथे अखंडपणे राबविण्यात येत आहे. शिवसेना नेते, खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या सामाजिक उपक्रमाचे संपूर्ण विमानतळ परिसरात कौतुक होत आहे. या वेळी भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, सहचिटणीस विजय शिर्के, मिलिंद तावडे, नीलेश ठाणगे, दिनेश परब आणि विमानतळ विभागातील सर्व कार्यकारिणी सदस्य, कामगार उपस्थित होते.