अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. फिलाडेल्फिया येथील नॅशनल कॉन्स्टिटय़ुशन सेंटरमध्ये हिंदुस्थानी वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता या डिबेटला सुरुवात झाली. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात 90 मिनिटे चाललेली पहिली डिबेट डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी जिंकली आहे. डिबेट सुरू होण्यापूर्वी कमला हॅरिस आणि ट्रम्प यांनी व्यासपीठावर पोहोचताच हस्तांदोलन केले. त्यानंतर डिबेटला सुरुवात झाली. या डिबेटमध्ये ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्यावर वैयक्तिक हल्ले केले. परंतु, कमला हॅरिस यांनी या हल्ल्याला हसून प्रत्युत्तर दिले. या चर्चेत हॅरिस यांनी 37 मिनिटे 36 सेकंद तर ट्रम्प यांनी 42 मिनिटे 52 सेकंद युक्तीवाद केला. कमला हॅरिस या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर अवघ्या दोन वर्षांत इस्रायलचा नाश होईल, असा दावा ट्रम्प यांनी केला. याला कमला हॅरिस यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ट्रम हे राष्ट्राध्यक्ष असते तर पुतीन हे कीवमध्ये आले असते आणि तुम्हाला लंचसोबत खाल्ले असते, असा जोरदार प्रतिहल्ला केला. डिबेट झाल्यानंतर दोन्ही नेते हस्तांदोलन न करता आपापल्या दिशेने परतले. अमेरिकेच्या मीडिया हाऊस न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन, वॉशिंग्टन पोस्ट, बीबीसी या चार मीडिया हाऊसच्या सर्वेक्षणात कमला या विजयी ठरल्या. दोन्ही उमेदवारांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ट्रम्प आणि कमला यांच्यातील पहिले आणि अखेरचे प्रेसिडेन्शियल डिबेट होते. कमला यांनी पहिल्यांदाच अध्यक्षीय निवडणुकीच्या चर्चेत भाग घेतला. तर ट्रम्प यांनी आतापर्यंत 5 वेळा सहभाग घेतला.
दोन्ही पक्ष इमिग्रेशन आणि सीमा सुरक्षा हा मोठा मुद्दा मानतात. कमला, यावर तुमचा पक्ष काय करत आहे?
कमला – इमिग्रेशनशी संबंधित समस्यांसाठी ट्रम्प जबाबदार आहेत. त्यांच्या पक्षाने यासंबंधीचे विधेयक रोखण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांनी आपल्या लोकांना बोलावून तसे करण्यास सांगितले. कारण समस्या संपू नये असे त्यांना वाटते.
ट्रम्प, तुम्ही 6 आठवडय़ांनंतरही गर्भपाताला परवानगी देऊ असे सांगितले होते, परंतु नंतर भूमिका बदलली.
ट्रम्प – मी गर्भपातावर बंदी घालणार नाही. या मुद्दय़ाने 52 वर्षांपासून देशाचे विभाजन झाले आहे. अमेरिकेतील सर्व राज्ये आता गर्भपाताबाबत आपापले निर्णय घेत आहेत. मला गर्भपात विधेयकावर व्हेटोची गरज नाही, कारण कमला हॅरिस कधीही निवडणूक जिंकणार नाहीत. कमला डाव्या विचारसरणीच्या आहेत. त्यांचे वडील कम्युनिस्ट आहेत.
डिबेटचे नियम?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांना निवडणूक जिंकण्यासाठी डिबेट खूप महत्त्वाची आहे. अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. एबीसी न्यूज अँकर डेव्हिड मुइर आणि लिनसे डेव्हिस यांनी या डिबेटचे आयोजन केले होते. दोन्ही उमेदवारांना एक एक करून प्रश्न विचारण्यात आले. दोघांना उत्तर देण्यासाठी आणि प्रतिवाद करण्यासाठी 2 मिनिटे देण्यात आली होती. उमेदवारांना 1 पेन, 1 नोटपॅड आणि 1 पाण्याची बाटली देण्यात आली. उमेदवार मत मांडण्याच्या वेळी त्यांचे मायक्रोपह्न चालू ठेवण्यात आले. यावेळी ट्रम्प आणि हॅरिस यांना त्यांच्या कर्मचाऱयांशी बोलण्याची परवानगी नव्हती.