राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत कमला हॅरिस

अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. सध्या उमेदवारीसाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार डिबेट सुरू आहेत. परंतु या डिबेटमध्ये बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी सोडावी, अशी मागणी करत आहेत. टेक्सासचे खासदार लॉयड डॉगेट यांनी उघडपणे ही मागणी केल्याने आता जो बायडेन यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवावी, या मागणीने जोर धरला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना स्मृतिभ्रंश आहे, असा दावा अमेरिकन पत्रकार आणि ट्रम्प समर्थक टकर कार्लसन यांनी केला आहे. 28 जून रोजी अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय डिबेटदरम्यान, बायडेन अनेक वेळा अडखळत बोलताना आणि सुस्तावलेले दिसले. ट्रम्प यांच्या विरोधातील वादात त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून त्यांच्या वय आणि क्षमतेवर पक्षात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.