
पती दारुडा असल्याने तिला पोटातले बाळ नको झाले होते. ही बाब तिच्या ओळखीच्या महिलेला कळताच दोघींमध्ये एक समझोता झाला. बाळाला तू जन्म द्यायचा आणि मग ते बाळ मला द्यायचे, असे दोघींमध्ये ठरले. त्याप्रमाणे बाळाची देवाणघेवाणदेखील झाली. पण अचानक प्रकृती बिघडल्याने इस्पितळात नेल्यावर चार महिन्यांच्या बाळाला एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आणि निर्दयी मातेच्या सहमतीने झालेल्या या मानवी तस्करीचा भंडाफोड झाला.
कल्याण येथे राहणारी शिल्पा पांडे ही सहा महिन्यांची गर्भवती होती. त्या वेळी पतीच्या दारूच्या व्यसनापायी तिला पोटात वाढत असलेले बाळ नकोसे झाले. ही बाब तिच्या ओळखीच्या शहनाज शेख हिला कळली. तेव्हा ते बाळ स्वीकारण्याची तयारी शहनाजने दाखवली. त्यानुसार चार महिन्यांपूर्वी शिल्पा परळच्या केईएम इस्पितळात शहनाज शेख या नावाने दाखल झाली. शहनाजच्या नावाचे आधार कार्डदेखील तिने त्या वेळी इस्पितळात दिले आणि मुलगी झाल्यानंतर शहनाजच्या सांगण्यावरून मुलीचे नाव माहिरा शेख असे ठेवले. त्यानुसार मुलीचे जन्म प्रमाणपत्रदेखील बनवून घेतले. दरम्यान गेल्या आठवडय़ात मुलीची तब्येत खूपच बिघडल्याने शहनाज तिला घेऊन परळच्या वाडिया इस्पितळात आली. त्या वेळी बाळाची अपेंडीसची शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हा झालेल्या चाचणीत बाळाला एचआयव्ही असल्याचे समोर आले.
मी नाही, शिल्पा तिची आई
बाळाला गंभीर आजार झाल्याचे कळताच डॉक्टरांनी शहनाजला आई म्हणून चाचणी करण्यास सांगितले. बाळाला गंभीर आजार झाला असे कळताच तिने हात वर केले. मी मुलीची आई नाही. मुलीची आई शिल्पा पांडे नावाची बाई असून ती कल्याणला राहते. तिला हे बाळ नको होते. हे मला समजताच ते बाळ स्वीकारण्याची मी तयारी दाखवली. मग शिल्पाने माझे नाव धारण करून ती बाळंतपणासाठी इस्पितळात दाखल झाली. शिवाय माझ्या नावाचे आधार कार्ड वापरून माझ्या सांगण्यावरून मुलीचे नाव माहिरा असे ठेवले, अशी शहनाजने कबुली दिली. त्यामुळे याची गंभीर दखल घेत महिला बाल विकास विभागाच्या चाईल्ड लाईफ हेल्पलाईनमध्ये समन्वयक म्हणून काम करणाऱया श्रद्धा नारकर यांच्या तक्रारीवरून शिल्पा पांडे व शहनाज शेख या दोघींविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.