धूप लावण्याच्या किरकोळ वादातून परप्रांतीय अधिकाऱयाने मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना कल्याणमध्ये घडली. तुम्ही मराठी माणसे घाणेरडी आहात, मच्छी-मटण खाता, बिल्डिंगमध्ये राहण्याची तुमची लायकी नाही, अशी गरळ ओकत अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत गुंड आणून दोन कुटुंबांना मारहाण केली. मराठी तरुणाचे डोके फोडून महिलेचा विनयभंग करण्यापर्यंत अखिलेश शुक्ला या माथेफिरू अधिकाऱयाची मजल गेली. कहर म्हणजे मी मंत्रालयात काम करतो, रोज 56 मराठी माझ्यासमोर झाडू मारतात, पोलीस मला घाबरतात, मुख्यमंत्री कार्यालयात एक फोन केला तर तुमच्या मराठीपणाची हवा निघून जाईल, अशी गरळ ओकणाऱ्या अखिलेश शुक्लावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी परस्परविरोधी फिर्याद नोंद केल्याने कल्याणमध्ये संताप व्यक्त होत आहे.
योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत अखिलेश शुक्ला राहतो. बुधवारी रात्री शुक्लाची पत्नी गीता हिने घराच्या बाहेर धूप लावला होती. लॉबीमध्ये दुर्घटना होऊ नये म्हणून बाहेर धूप लावताना काळजी घ्या, अशी विनंती शेजारी राहणारे अभिजित देशमुख आणि विजय कळवीकट्टे या कुटुंबीयांनी शुक्ला कुटुंबाला केली. मात्र ही विनंती म्हणजे शुक्लाला अपमान वाटला. त्याने थेट लता कळवीकट्टे यांच्याशी भांडण सुरू केले.
तुम्ही मराठी माणसे घाणेरडी आहात, बिल्डिंगमध्ये राहण्याची तुमची लायकी नाही, मटण, मच्छी खाता असे अद्वातद्वा बरळू लागला. यावेळी देशमुख कुटुंबाने हस्तक्षेप करत तुम्ही आम्हाला व्यक्तिगत बोला. महाराष्ट्रीयन माणसांचा अपमान करू नका, असे शुक्लाला बजावले. यावर शुक्ला याने तुमच्या मराठीपणाची हवा अर्ध्या तासात बाहेर काढतो, तुमचा मर्डरच करतो, अशी धमकी देऊन गुंड टोळीला फोन केला. यानंतर काही वेळातच आठ ते दहा गुंड हातात शस्त्रs घेऊन बिल्डिंगमध्ये आले. त्यांनी धीरज देशमुख, अभिजित देशमुख, विजय कळवीकट्टे यांना मारहाण केली. डोक्यात रॉड घालून अभिजित देशमुख यांचे डोके फोडले. तर शुक्ला याने माधुरी देशमुख यांचा विनयभंग केला. अर्धा तास गुंडांचा धुडघूस सुरू होता.
अखिलेश शुक्ला मंत्रालयात काम करतो. गाडीवर अंबर दिवा लावून कल्याणमध्ये फिरत असतो. शुक्लाच्या दहशतीमुळे सोसायटीत भीतीचे वातावरण आहे. तरीही खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी शुक्लासह देशमुख कुटुंबावरही गुन्हा दाखल केला. पोलीस शुक्ला याला पाठीशी घालत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.