
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केली आहे. तळोजा कारागृहामध्ये रविवारी पहाटे टॉवेलने गळफास घेत त्याने जीवन संपवले.
कल्याण पूर्व येथील 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याला पोलिसांनी शेगावमधून अटक केली होती. गेल्या साडे तीन महिन्यांपासून तो तजोळा कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता. रविवारी पहाटे त्याने टॉवेलने गळफास घेत जीवन संपवले. यामुळे एकच खळबळ उडाली असून कारागृह प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
अत्याचारानंतर हत्या
कोळसेवाडी चक्की नाका भागातील अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह बापगाव परिसरातील कब्रस्तानजवळ सापडला. विशाल गवळी या नराधमाने तिचे अपहरण करून तिची हत्या केली आणि मृतदेह बापगाव येथे फेकून दिला.
मृतदेह सुटकेसमध्ये भरून रिक्षातून नेला
विशाल गवळी याची एकूण तीन लग्न झाली आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खासगी बँकेत नोकरीला आहे. विशालने पहिल्या दोन बायकांप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी त्याच्या पत्नीनेही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत केली. एका रिक्षातून या दुर्दैवी मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून भिवंडीजवळील बापगाव परिसरात या दोघांनी नेला आणि तेथे फेकून दिला. ज्या रिक्षातून विशाल आणि त्याच्या बायकोने अल्पवयीन मुलीचा मृतदेह कल्याणमधून भिवंडीत नेला ती रिक्षाही पोलिसांनी जप्त केली होती.