Kalyan Rape Case : कल्याण बलात्कार पीडितेच्या घरावर हल्ला, दारू पिऊन गुंडांचा घराबाहेर धिंगाणा

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेतील आरोपी नराधम विशाल गवळी व त्याची पत्नी जेलमध्ये आहेत. मात्र गवळीचे हस्तक पीडित कुटुंबाला केस मागे घेण्यासाठी वारंवार धमकावत आहेत. रविवारी मध्यरात्री तीन गुंडांनी कुटुंबीयांना शिवीगाळ करत घराबाहेर तोडफोड केली.

विशालला जामीन झाला तर एके-47 घेऊन येऊन गोळ्या घालू, अशी धमकीच गुंडांनी कुटुंबाला दिल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.  पीडित मुलीचे कुटुंब या धक्क्यातून अजून सावरलेले नसताना गवळीचे हस्तक त्यांच्यावर केस मागे घेण्यासाठी दबाब आणत आहेत. कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी असतानाही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच रविवारी रात्री तीन अज्ञात गुंडांनी दारू पिऊन घराबाहेर धिंगाणा घातला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या प्रकरणी पुरुषोत्तम शेलार या तरुणाला बेड्या ठोकल्यात. विशाल गवळीच्या तिघा भावांना तडीपार केले  आहे. तरीही यातील दोघे अजूनही  राजरोस फिरत असल्याचा आरोप  आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली

दरम्यान या प्रकरणात कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची तडकाफडकी कल्याण पोलीस पंट्रोलमध्ये बदली करण्यात आली आहे. डीसीपी अतुल झेंडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याने ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.