
कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृणपणे हत्या करणारा नराधम विशाल गवळीचा अखेर खेळ खल्लास झाला आहे. कायद्याने शिक्षा होण्याआधीच त्याने आत्महत्या करून स्वतःला संपवले. आतापर्यंत त्याच्यावर आठ गुन्हे दाखल होते. या सर्व प्रकरणात तो जामिनावर सुटला होता. धक्कादायक बाब म्हणजे दोन पोस्को गुन्ह्यांतही वेळेवर चार्जशीट दाखल न झाल्याने त्याला जामीन मिळाला होता. कोळसेवाडीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतरही नराधम गवळीला पश्चाताप नव्हता. आपल्याला जामीन मिळेल या भ्रमात तो होता. मात्र पोलिसांनी सबळ पुरावे जमा करून 60 दिवसांच्या आत 1006 पानांचे दोषारोपपत्र कोर्टात दाखल करताच गवळी हादरला. फास्ट ट्रॅक कोर्टात फाशीची शिक्षा होईल अशी गवळीला धास्ती होती. या धास्तीनेच त्याने आत्महत्या केल्याची कल्याणमध्ये चर्चा आहे.
कल्याण पूर्वेत गवळीची दहशत होती. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या गुंड हस्तकांनी हत्या झालेल्या मुलीच्या कुटुंबाला शिवीगाळ करत घराबाहेर धुडगूस घातला होता. विशालला जामीन झाला तर एके ४७ घेऊन येऊन गोळ्या घालू अशी धमकी दिली होती. केस मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाब आणला होता. मात्र न्यायासाठी कुटुंब ठामपणे लढत होते. अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनीही विशाल गवळी याची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी ठोस पावले उचलली. विशाल गवळीच्या तिघा गुंड भावांना तडीपार केले. शिवाय या प्रकरणातील आरोपी विशाल आणि त्याची पत्नी साक्षीला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. या गुन्ह्याचे आरोपपत्र जलदगती न्यायालयात दाखल केले होते. अत्याचार करून चिमुरडीचा जीव घेणाऱ्या गवळीला फासावर लटकवण्यासाठी १००६ पानांचे दोषारोपपत्र मजबूत असल्याचा पोलिसांना विश्वास होता. त्यामुळे जामिनावर बाहेर येऊ हा विशालचा भ्रम धुळीस मिळाला. यातूनच तो खचला आणि त्याने आत्महत्या केली.
कुणाच्याच लेकीच्या वाट्याला असा प्रसंग नको !
विकृत विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बातमी समजताच नियतीने आणि परमेश्वराने न्याय केला अशी प्रतिक्रिया पीडित कुटुंबाने दिली. मृत मुलीच्या फोटोसमोर हात जोडून वडिलांनी साश्रूनयनांनी श्रद्धांजली वाहिली आणि असा प्रसंग कुणाच्याच वाट्याला येऊ नये, अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली.
क्रूर विशाल गवळीने जेलमध्ये आत्महत्या केल्याने मृत बालिकेला न्याय मिळाला. परंतु जनतेला हा न्याय अपेक्षित नव्हता. विकृत नराधम विशालला न्यायालयाकडून फाशी झाली असती तर असे घाणेरडे कृत्य करणाऱ्या इतर समाजकंटकांना वचक बसला असता. – दीपेश म्हात्रे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हाप्रमुख