
सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मोहने परिसरात घडली. विजय मोरे असे मृत रिक्षाचालकाचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात सावकार आणि एका महिलेचे नाव लिहिले होते. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी सावकार सचिन दळवी आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याणमधील मोहने परिसरात विजय मोरे हे पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. विजय मोरे हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. 31 मार्चला सायंकाळी विजय मोरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. उपचाराकरिता त्यांना रुग्णालयात नेले असता तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या खिशात डॉक्टरांना एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत कर्जदाराकडून माझा खूप छळ होतोय, कर्जदाराच्या जाचाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचे त्यांनी नमूद केले होते. सावकार सचिन दळवी आणि एक महिला पैशांसाठी मोरे यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ आणि मानसिक त्रास देत होते. या तणावातून त्यांनी आत्महत्या केली.