खेळत असताना मुलगा ग्रीलसह खाली पडला; सज्जावरून कोसळण्याआधीच अग्निशमन दलाने चिमुकल्याला वाचवले

घरात खेळत असताना सात वर्षीय चिमुकला लोखंडी ग्रीलमध्ये पडला. मात्र ग्रील कमकुवत असल्याने चिमुकला ग्रीलसह इमारतीच्या सज्जावर कोसळला. दैव बलवत्तर म्हणून वंश लांडगे याला काहीही झाले नाही. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन चिमुकला खाली पडण्याआधीच मोठ्या शिताफीने वाचवले. ही घटना कल्याणच्या विठ्ठलवाडी परिसरात घडली.

विठ्ठलवाडी परिसरातील चंद्रकिरण सोसायटीत वंश लांडगे आपल्या आई- वडिलांसह राहतो. गुरुवारी संध्याकाळी वंशची आई त्याला घरात एकटे सोडून बाजारात गेली. यावेळी घरात खेळता खेळता वंश खिडकीजवळ पोहोचला. खिडकीतून त्याने लोखंडी जाळीत उडी मारली. मात्र अचानक जाळीचे खिळे भिंतीतून निघाले आणि जाळी वंशसह खाली कोसळली. सुदैवाने खिडकीखाली सज्जा असल्यामुळे वंश त्या सज्ज्यावर अडकला. मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेऊन याची माहिती अग्निशमन दलाला दिली.

दोरीने बांधून सुखरूप खाली उतरवले

महापालिका मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. सज्जावर अडकलेल्या वंशला वाचवण्यासाठी जवान ॲलन डिसोझा यांनी शिडीच्या सहाय्याने सज्जावर पोहोचून बालकाला दोरीने सुरक्षितपणे अडकवले. नंतर त्यांनी त्याला पाठीवर घेत जमिनीवर सुखरूप आणले. वंशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून त्याला किरकोळ खरचटले आहे.