Kalyan: ‘मराठी माणसं घाण’ म्हणत सोसायटीत केली मारहाण, परप्रांतीयांची दादागिरी

कल्याण मधील एका सोसायटीमध्ये मराठी कुटुंबीयांना उत्तर भारतीयांकडून मारहाण झाल्याचं वृत्त आहे. ‘मराठी माणसं घाण असतात’ असं म्हणत मराठी कटुंबातील मुलांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर मराठी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मात्र त्याचवेळी पोलिसांवर दबाव असून ते संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोपही स्थानिक करत आहेत.

छोटाशा कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत झाले. अखिलेश शुक्ला असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळते आहे. सोसायटीतील मराठी कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार या अखिलेश शुक्लाने मराठी कुटुंबीय म्हणजे घाण असतात, घाण करतात, मासे वैगरे खातात असं म्हणत वाद घातला आणि मराठी कुटुंबीयांना मारहाण केली. यानंतर सोसायटीमधील पीडित मराठी कुटुंबीयांकडून पोलिसात तक्रार करण्यात आली, तेव्हा त्यांच्यावर किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. तसेच शुक्लाने पोलिसांवर दबाव टाकल्याचे पीडित कुटुंबीय सांगतात. दरम्यान, पोलिसांनी यात बोलताना टाळाटाळ केल्याचं कळतं आहे.