धूप लावण्याच्या वादातून परप्रांतीयाने गुंडांना बोलावून मराठी तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना योगिधाममधील अमजेरा हाईट्स सोसायटीत घडली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिसांना घटनेचे दोन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे आदेश दिले आहेत. मारहाण करणाऱ्या परप्रांतीयावर कठोर कारवाई व्हावी आणि त्याच्या साथीदार गुंडांना अटक करून मोक्कांतर्गत करण्यात यावी यासाठी मराठी तरुण धीरज देशमुख यांनी उच्च न्यायालय धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 20 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
18 डिसेंबरच्या रात्री कल्याण पश्चिमेतील उच्चभ्रू सोसायटीत धूप जाळण्याच्या कारणावरून तुफान राडा झाल्याची घटना घडली. दरम्यान मंत्रालयात पर्यटन विभागात कार्यरत असलेल्या अखिलेश शुक्ला या परप्रांतीयाने बाहेरून गुंड बोलावून देशमुख कुटुंबीयांना रॉड आणि लाकडी दांड्याच्या सहाय्याने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्लासह त्याची पत्नी गीता आणि इतर पाच जणांना गुन्हा दाखल करत अटक केली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला. तसेच मारहाण करणाऱ्या गुंडांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या कुटुंबीयांनी उच्च न्यालयालयाचे दरवाजे ठोठावत न्याय मागितला आहे.
गुंडांकडून घाबरवण्याचा प्रयत्न
मारहाणीच्या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबीयांचा गुंडांनी पोलीस ठाण्यापर्यंत पाठलाग करून घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्या गुंडांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सर्व हल्लेखोरांचा सीडीआर तपासावा अशी मागणी मराठी कुटुंबीयांनी केली आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाने 18 आणि 19 डिसेंबरचा सीसीटीव्ही जतन करून ठेवण्याचे आदेश कल्याण पोलिसांना दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते देशमुख कुटुंबीयांनी दिली आहे.