कल्याण पूर्व येथील 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी आणि त्याला या गुन्ह्यात मदत करणारी त्याची पत्नी साक्षी हिला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोळसेवाडी चक्की नाका भागातील अल्पवयीन मुलगी सोमवारी दुपारी घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली. त्यानंतर मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह बापगाव परिसरातील कब्रस्तानजवळ सापडला. विशाल गवळी या नराधमाने तिचे अपहरण करून तिची हत्या केली आणि मृतदेह बापगाव येथे फेकून दिला. मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत करणारी पत्नी माफीचा साक्षीदार बनली आणि विशालचे बिंग फुटले. त्यानंतर पोलिसांनी विशालला शेगावमधून अटक केली. गुरुवारी दोघांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांनाही 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
विशाल गवळीला राजकीय वरदहस्त, अनेक कुटुंबे परिसर सोडून गेली
आतापर्यंत बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद विशालवर आहे. कल्याण पूर्व परिसरात त्याची प्रचंड दहशत असल्यामुळे काही कुटुंबे परिसर सोडून निघून गेली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळीला राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जाते. त्यामुळे दाखल गुन्ह्यांतील फिर्यादींना दमदाटी करून ते मागे घेण्यास तो भाग पाडतो. त्यामुळे त्याला नेमका कुणाचा राजकीय वरदहस्त आहे याचीही चर्चा आहे.
मृतदेह सुटकेसमध्ये भरून रिक्षातून नेला
विशाल गवळी याची एकूण तीन लग्न झाली आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खासगी बँकेत नोकरीला आहे. विशालने पहिल्या दोन बायकांप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी त्याच्या पत्नीनेही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत केली. एका रिक्षातून या दुर्दैवी मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून भिवंडीजवळील बापगाव परिसरात या दोघांनी नेला आणि तेथे फेकून दिला. ज्या रिक्षातून विशाल आणि त्याच्या बायकोने अल्पवयीन मुलीचा मृतदेह कल्याणमधून भिवंडीत नेला ती रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे.
लूक बदलताना अटक
दुर्दैवी मुलीचा नराधम विशालने एक वर्षापूर्वी विनयभंग केला होता. याप्रकरणी त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा पोक्सोचा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी विशालने त्या मुलीच्या कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला होता. परंतु मुलीचे कुटुंब दबावापुढे झुकले नाही. हा राग मनात ठेवून विशालने त्या मुलीची हत्या केली. त्यानंतर तो सासूरवाडीला शेगाव येथे पळाला. मुलीच्या वडिलांनी संशयित म्हणून त्याचे नाव पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली. यावेळी त्याची पत्नी घरी होती. तिने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आणि कल्याण पोलिसांनी शेगाव पोलिसांना याची खबर दिली. पत्नीने विशालला कॉल करताच पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले. विशाल शेगावच्या शिवाजी चौकातील सलूनमध्ये दाढी काढून लुक बदलण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.