विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केडीएमसीचा निर्णय; कल्याण, डोंबिवलीतील 61 शाळांमध्ये ‘तिसऱ्या डोळ्या’चा वॉच

विद्यार्थिनींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने मोठा निर्णय घेऊन महापालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 61 शाळांमध्ये एकूण 502 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता अधिक मजबूत होणार असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.

बदलापूर येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य शासनाने शाळांमधील सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलली. राज्यातील सर्व शासकीय, खासगी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी पालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. यानुसार मागील सात महिन्यांत केडीएमसीच्या 61 शाळांमध्ये 502 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यामुळे आता शाळांतील प्रत्येक हालचालींवर तिसऱ्या डोळ्याची म्हणजेच सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण शाळेच्या मुख्याध्यापकांच्या दालनात ठेवण्यात आले आहे.

डाटा सुरक्षित ठेवणार शाळा सुरू झाल्यापासून ते सुटेपर्यंत या कॅमेऱ्यांद्वारे सर्व घडामोडींवर नजर ठेवली जाणार आहे. सीसीटीव्ही फुटेजची नियमित तपासणी मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली केली जाणार असून सर्व डाटा सुरक्षित ठेवला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत मोठी सुधारणा होईल आणि पालकांमध्येही विश्वास वाढेल, असे महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी सांगितले.