
गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमधून पडून डोंबिवलीतील रुपेश गुजर या तरुणाचा गुरुवारी हकनाक बळी गेला. या दुर्घटनेनंतर डोंबिवली ठाणे मार्गावरील धोकादायक प्रवास पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईची ‘लाईफलाईन’ असलेली रेल्वे सेवा प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहे. या वर्षीच्या जानेवारी ते मार्च या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत कल्याण व डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या अखत्यारित येणाऱ्या 24 रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे अपघातात तब्बल 82 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 83 प्रवासी जखमी झाले आहेत.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 16 रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. यात कर्जत मार्गावरील कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, तानशेत, खर्डी, उंबरमाळी आणि कसारा ही ठिकाणे येतात. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या अखत्यारित डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, अप्पर कोपर, भिवंडी, खारवा, कामत आणि जुचंद्र अशी 8 स्थानके आहेत. दरवर्षी रेल्वे अपघात वाढतच आहेत. यामध्ये बऱ्याचदा प्रवाशांचा बेफिकिरीपणा, शॉर्टकट ही कारणे आहेत. रेल्वे रूळ ओलांडणे, चढत उतरत असताना पाय घसरून पडणे, ट्रेनच्या दरवाजात उभे राहून प्रवास करताना पडणे, टपावरून प्रवास करताना शॉक लागणे अशा प्रकारांमुळे बळी गेलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. गर्दीच्या वेळी प्रवासी लोकलमधून लटकून प्रवास करतात आणि अनेकदा पोल, सिग्नल वा इतर अडथळ्यांना धडकून जखमी अथवा मृत्युमुखी पडतात.
कल्याण, डोंबिवलीहून जादा गाड्यांची मागणी
रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटकाही प्रवाशांना बसत आहे. डोंबिवली सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे. मात्र प्रवासी सेवा देण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी डोंबिवली, कल्याणहून सोडण्यात येणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी आहे. मात्र रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप प्रवासी संघटनांचा आहे.
जनजागृती करूनही दुर्घटनांमध्ये वाढ
रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षित प्रवासासाठी सातत्याने जनजागृती मोहीम सुरू असते. धोकादायक प्रवास टाळण्यासाठी आवाहन केले जाते. सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र तरीही अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे.