
बोगस रेरा नोंदणी घेऊन आणि अधिकाऱ्यांचे बनावट सही, शिक्के वापरून काही बिल्डर आणि भूमाफियांनी कल्याण, डोंबिवलीत शेकडो बेकायदा इमारती उभ्या केल्या आहेत. येथील ६५ इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. बिल्डरांच्या फसवणुकीमुळे साडेसहा हजारांहून अधिक कुटुंबांचे संसार रस्त्यावर येण्याचा धोका आहे. या घोटाळा प्रकरणात काही राजकीय पदाधिकारी, दलाल आणि अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात रहिवासी एकवटले असून या भ्रष्ट साखळीविरोधात त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये सामूहिकरीत्या तक्रारी द्यायला सुरुवात केली आहे. आजपासून रविवारपर्यंत हजारो रहिवासी तक्रारींचा पाऊस पाडणार आहेत. दरम्यान आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत कार्यालयावर धडक देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या या साखळीविरोधात अधिकाऱ्यांनीही स्वतःहून पोलिसांत तक्रार द्यावी या मागणीचे निवेदन दिले
महारेरा घोटाळा उघड झाल्यानंतर कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीमध्ये ६५ इमारती बेकायदा असल्याचे उघड झाले. बोगस महारेरा नोंदणी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे या इमारती बांधल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शासनाने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे. मात्र एसआयटीच्या कारवाईवर रहिवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बडे बिल्डर, भूमाफिया, दलाल आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली नाही. काहींना अटक केली असली तरी बडे मासे मात्र मोकाट आहेत. यामध्ये हजारो रहिवाशांच्या डोक्यावरचे छप्पर मात्र हिरावले जाणार आहे. राजकीय हस्तक्षेप होत असल्याने हे प्रकरण दावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
शिवसेनेच्या पाठबळामुळे आंदोलन तीव्र
रेरा नोंदणी, बँकांचे कर्ज घेऊन, स्टॅम्प ड्यूटी भरून मध्यमवर्गीयांनी घरे खरेदी केली. काही चूक नसताना आता हीच घरे भूईसपाट होण्याचा धोका आहे. साडेसहा हजार नागरिकांची घरे वाचवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने खंबीर भूमिका घेतली आहे. कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली फसवणूक झालेल्या रहिवाशांसाठी विशेष तक्रार अर्ज तयार करण्यात आला आहे. डोंबिवलीतील पूर्व आणि पश्चिम शिवसेना शाखेतून या अर्जाचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. आतापर्यंत सुमारे 1100 रहिवाशांनी हे अर्ज घेतले असून आजपासून पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल केल्या जात आहेत. पहिल्या दिवशी डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी हाईट्स इमारतीतील 15 रहिवाशांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. शनिवार, रविवारी सातशेहून अधिक रहिवासी तक्रारी दाखल करणार आहेत. अनेकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.
प्रांत अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
65 बेकायदा इमारतींच्या प्रकरणात बिल्डरांनी शासनाचीही फसवणूक केली आहे. त्यामुळे याप्रकरणी अधिकाऱ्यांनी बिल्डरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी कल्याण प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेऊन केली. या मागणीची गंभीर दखल घेत गुजर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच बेकायदा इमारती उभारणाऱ्या दोषी बिल्डर आणि बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. यावेळी शहरप्रमुख अभिजित सावंत, प्रकाश तेलगोटे, संजय पाटील, राहुल भगत, प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते