कल्याण पूर्व येथील 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याला पोलिसांनी शेगावमधून अटक केली. त्या दुर्दैवी मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत करणारी पत्नी माफीचा साक्षीदार बनली आणि विशालचे बिंग फुटले. सासूरवाडी शेगावला पळालेला विशाल सलूनमध्ये दाढी करून आपला लुक बदलण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी सापळा लावून त्याच्यावर झडप घातली. नराधम विशाल गवळी हा बदलापूर अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदे याच्यापेक्षाही भयंकर असून त्याचीही तीन लग्न झाली आहेत. बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, चिमुकल्यांचे लैंगिक शोषण, छेडछाड अशा वेगवेगळ्या प्रकरणांत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. एकीकडे क्रिम खाती, बंगले आणि दालनांसाठी मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजप महायुतीच्या सत्ताकाळात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या असून महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. ‘लाडक्या बहिणी’ असुरक्षित आहेत.
नेमकी घटना काय?
कोळसेवाडी चक्की नाका भागातील अल्पवयीन मुलगी सोमवारी दुपारी घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली. त्यानंतर मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह बापगाव परिसरातील कब्रस्तानजवळ सापडला. विशाल गवळी या नराधमाने तिचे अपहरण करून तिची हत्या केली आणि मृतदेह बापगाव येथे फेकून दिला. क्रूरकर्मा विशाल गवळी याने या आधीही क्लासवरून घरी जाणाऱ्या एका मुलीवर भररस्त्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशाल गवळीला राजकीय वरदहस्त, अनेक कुटुंबे परिसर सोडून गेली
आतापर्यंत बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद विशालवर आहे. कल्याण पूर्व परिसरात त्याची प्रचंड दहशत असल्यामुळे काही कुटुंबे परिसर सोडून निघून गेली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळीला राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जाते. त्यामुळे दाखल गुन्ह्यांतील फिर्यादींना दमदाटी करून ते मागे घेण्यास तो भाग पाडतो. त्यामुळे त्याला नेमका कुणाचा राजकीय वरदहस्त आहे याचीही चर्चा आहे.
साक्षीला पोलीस कोठडी; विशालला आज कोर्टात हजर करणार
पीडित अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या कटात सहभागी झालेली विशाल गवळीची पत्नी साक्षी माफीची साक्षीदार झाली आहे. पोलिसांनी तिला आज कल्याण कोर्टात हजर केले असता न्यायालयाने साक्षीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर विकृत विशालला गुरुवारी कल्याण कोर्टात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने माजी महापौर रमेश जाधव यांनी डीसीपी अतुल झेंडे यांना दिले.
मृतदेह सुटकेसमध्ये भरून रिक्षातून नेला
विशाल गवळी याची एकूण तीन लग्न झाली आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खासगी बँकेत नोकरीला आहे. विशालने पहिल्या दोन बायकांप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी त्याच्या पत्नीनेही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत केली. एका रिक्षातून या दुर्दैवी मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून भिवंडीजवळील बापगाव परिसरात या दोघांनी नेला आणि तेथे फेकून दिला. ज्या रिक्षातून विशाल आणि त्याच्या बायकोने अल्पवयीन मुलीचा मृतदेह कल्याणमधून भिवंडीत नेला ती रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे.
शिवसेनेचा आज मोर्चा
कोळसेवाडीतील घटना निंदनीय आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी तसेच महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असून झोपी गेलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजता कोळसेवाडी शाखेपासून निघणारा मोर्चा कोळसेवाडी पोलीस ठाणे आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यावर धडकणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे आणि शहरप्रमुख शरद पाटील यांनी दिली.
ओळख पटू नये म्हणून त्याने दाढी काढली
दुर्दैवी मुलीचा नराधम विशालने एक वर्षापूर्वी विनयभंग केला होता. याप्रकरणी त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा पोक्सोचा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी विशालने त्या मुलीच्या कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला होता. परंतु मुलीचे कुटुंब दबावापुढे झुकले नाही. हा राग मनात ठेवून विशालने त्या मुलीची हत्या केली. त्यानंतर तो सासूरवाडीला शेगाव येथे पळाला. मुलीच्या वडिलांनी संशयित म्हणून त्याचे नाव पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली. यावेळी त्याची पत्नी घरी होती. तिने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आणि कल्याण पोलिसांनी शेगाव पोलिसांना याची खबर दिली. पत्नीने विशालला कॉल करताच पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले. विशाल शेगावच्या शिवाजी चौकातील सलूनमध्ये दाढी काढून लुक बदलण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.
फासावर लटकवा; वडिलांचा टाहो
नराधम आरोपीने आमचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. माझ्या मुलीवर अत्याचार करून तिचा निघृण खून करणाऱ्या आरोपी विशाल गवळीला फासावर लटकवा, अशी मागणी करत मृत मुलीच्या वडिलांनी सरकारकडे टाहो फोडला आहे.
मुख्यमंत्री राजीनामा द्या!
कल्याण पूर्वेत राजरोसपणे चोऱ्यामाऱ्या, लुटमारी, अत्याचार, विनयभंग आणि हत्या हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक नवीन सिंह यांनी केली आहे.