आधी गोळी मारली, मग डोक्यात आठ वेळा चाकू खुपसून हत्या; कल्याणमध्ये चुलतभावाला संपवले

उत्तर प्रदेशमधील जमिनीच्या वादाचे पडसाद कल्याणमध्ये उमटले असून यामध्ये एकाला हकनाक जीव गमवावा लागला आहे. रणजीत दुबे (वय – 40) याच्यावर त्याचा चुलतभाऊ रामसागर दुबे (वय – 29) याने कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात बंदुकीतून गोळीबार केला.

गोळी लागल्यानंतर रणजीत दुबे धावत सुटला. काही वेळातच तो धडपडून खाली पडला. यावेळी पाठलाग करत आलेल्या रामसागरने रणजीतच्या डोक्यात आठ वेळा चाकू खुपसला. या हल्ल्यात रणजीत जागीच ठार झाला. या भयंकर हत्याकांडाने कल्याण हादरून गेले. पोलिसांनी 24 तासात आरोपी रामसागरला बेड्या ठोकल्या आहेत.

मूळचे उत्तर प्रदेशमधील असलेले दुबे कुटुंबीय कल्याणमध्ये वास्तव्यास आहेत. मृत रणजीत दुबे आणि आरोपी रामसागर दुबे हे चुलतभाऊ असून त्यांच्यात मूळ गावी उत्तर प्रदेश येथे जमिनीच्या मालकीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. याच वादातून बुधवारी रात्री लवकुश अपार्टमेंट, काटेमानिवली येथे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.

रागाच्या भरात रामसागर याने बंदुकीतून गोळी झाडली. यानंतर धारदार शस्त्राने रणजीतच्या डोक्यात आठ वार केले. याप्रकरणी मृत रणजीत दुबेची बहीण पूनम तिवारी हिने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.