
विद्यापीठ कायद्याच्या नियमांची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न करता कल्याणमध्ये सुरू असलेले आयआरएनई बी.एड महाविद्यालय युवासेनेच्या दणक्यामुळे अखेर बंद झाले आहे. या महाविद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून शिक्षण दिले जात होते.
या महाविद्यालयाची स्वत:ची इमारत नाही. तसेच या महाविद्यालयात कोणत्याही प्रकारचे शिक्षक-शिक्षककेत्तर कर्मचारी नाहीत, ग्रंथालय नाही. त्यामुळे या महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी महाविद्यालयात येतच नाहीत अशी गंभीर स्थिती होती. या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एक ठराविक रक्कम घेऊन त्यांना शिक्षकाची म्हणजे बी.एड ची पदवी दिली जात होती. या बोगस प्रकरणासाठी मुंबई विद्यापीठ प्रशासनाचादेखील पाठिंबा असल्याचे समोर आले होते.
कॉलेजला दहा लाखांचा दंड
सदर महाविद्यालय यूजीसी व विद्यापीठाच्या नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे अशी तक्रार युवासेना सहसचिव अॅड. संतोष धोत्रे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व प्र-कुलगुरू यांना लेखी निवेदन दिले होते. याची दखल घेऊन विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्य समिती नेमली होती. चौकशीनंतर या ठिकाणची फसवणूक समोर आल्यामुळे सदर संस्थेला दहा लाखांचा दंड ठोठावून कॉलेज बंद करण्यात आले.