
ठाणे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) तथा निवडणूक अधिकारी किशोर मांडे यांनी 28 फेब्रुवारी रोजी कल्याण बाजार समितीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. मात्र अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करून निवडणूक घेण्याऐवजी त्यांनी स्वतः च प्रशासक म्हणून एपीएमसीचा कारभार हाती घेतला. याबाबतचे वृत्त ‘सामना’त प्रसिद्ध होताच व्यापारी आणि काही संचालकांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे मांडे यांच्या बेकायदा कारभाराची तक्रार केली. याची गंभीर दखल घेत निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी बाजार समितीचे इलेक्शन लांबणीवर टाकणाऱ्या जिल्हा उपनिबंधकांकडून आज खुलासा मागितला. शिवाय तत्काळ अंतिम यादी प्रसिद्ध करून निवडणूक घेण्याचे आदेशही दिले.
पणन मंत्र्यांकडे बोट
साहेब.. निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर करणार, अशी विचारणा जिल्हा उपनिबंधक मांडे यांना केल्यानंतर माझ्या हातात काही नाही, पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे विचारणा करा. त्यांनी इलेक्शन पुढे ढकलण्यास सांगितले आहे, अशी उत्तरे मांडे देत असल्याचा आरोप काही व्यापारी आणि माजी संचालकांनी केला आहे. भाजपमधील अंतर्गत गटबाजीतून निवडणूक पुढे ढकलली जात असल्याचीही चर्चा आहे. याचा फटका मात्र बाजार समितीच्या कारभाराला बसला आहे.
कामकाजात हयगय केल्याचे ताशेरे
28 फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बाजार समिती नियम 2017 चे नियम 7 मधील तरतुदीनुसार 25 मार्चपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होते. मात्र किशोर मांडे यांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली नाही. याची गंभीर दखल घेत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी मांडे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. निवडणूक नियमांतील तरतुदींचे तसेच प्राधिकरणाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या आदेशांचे व सूचनांचे उल्लंघन झाल्याचा ठपका मांडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून निवडणुकीसारख्या संविधानिक कामकाजात हयगय व दुर्लक्ष करणारी आहे, असे म्हणत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबत झालेल्या विलंबाचा खुलासाही 28 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश मांडे यांना दिले आहेत.