कल्याणच्या न्यायालयात शनिवारी एका आरोपीने न्यायाधीशांसमोर चप्पल भिरकावली होती. ही घटना ताजी असतानाच कोर्ट आवारात एक व्यक्ती कमरेला पिस्तूल लावून खुलेआम फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर पोलिसांच्या झोड उठली होती. त्यामुळे कल्याणच्या जिल्हा व सत्र न्यायालयात कर्तव्यावर असलेले पोलीस निष्काळजी वागत असल्याचा ठपका ठेवून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी 11 पोलिसांना निलंबित केले आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील किरण भरम याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या समोर पोलिसांनी हजर केले होते. यावेळी किरण याने न्यायालयाला टेबल बदल करण्याची मागणी केली. न्यायालयाने किरण याला तुम्ही तुमच्या वकिलामार्फत तसा अर्ज द्या असे सांगितले. यामुळे संतापलेल्या आरोपीने पायातील चप्पल काढली आणि ती न्यायाधीश वाघमारे यांच्या दिशेने फेकली. चप्पल फेकल्याच्या घटनेनंतर आरोपीच्या सोबत असलेले पोलीस काय करत होते, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
ही घटना ताजी असतानाच कल्याण न्यायालय आवारात एका व्यक्तीसोबत एक बंदूकधारी खासगी सुरक्षारक्षक फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. न्यायालय आवारात शस्त्र घेऊन फिरण्यास प्रतिबंध असताना बंदूकधारी व्यक्ती न्यायालय आवारात आलाच कसा, असा प्रश्न वकिलांकडून उपस्थित करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ११ पोलिसांना आज निलंबित केले.