
कुटुंब पाठीशी असेल तर कठीण परिस्थितीवरसुद्धा मात करता येते, हे सिद्ध करून दाखवलंय हरयाणातील सोनीपत जिह्यातील कल्पना रावत या महिलेने. लग्न झाल्यानंतरही शिक्षणाची जिद्द कायम होती. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कोचिंग लावली नाही. केवळ पतीने सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या. मन लावून अभ्यास करत परीक्षेची तयारी केली. 2024 च्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेत देशातून 76 वी रँक मिळवली. कल्पनाचा विवाह 6 डिसेंबर 2024 रोजी बरेलीची रहिवासी आणि 2021 च्या बॅचचे आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांच्याशी झाला. विवाह झाला असला तरी मनात दडलेले आयएएस होण्याचे स्वप्न कल्पना यांनी जिवंत ठेवले. नवऱयाशी हितगुज केल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी केली. लग्नानंतर घरातील कामे सांभाळावी लागल्याने कल्पनाने कोचिंग लावले नाही. घरीच नवऱयाकडून कोचिंग घेतले. तसेच यूटय़ूब आणि टेलिग्रामवरील व्हिडीओंची मदत घेत अभ्यास सुरू ठेवला.
तिसऱया प्रयत्नात यश
कल्पना रावतने याआधी दोन वेळा यूपीएससीची परीक्षा दिली. परंतु अपयश आले. कल्पनाने हार न मानता अभ्यास आणि परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. तिसऱया प्रयत्नात कल्पनाला यश आले. कल्पनाने हे यश विनाकोचिंग मिळवले आहे. यूपीएससीची तयारी करत असताना कल्पनाने सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवले. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर केवळ शिक्षणासाठी केला. काहीतरी करायची जिद्द मनात असेल तर कोणत्याही कामाला यश हमखास मिळते, हे कल्पना रावतने दाखवून दिले आहे. कल्पनाचे सासरे वकील, तर पती आयएएस अधिकारी आहेत.
आजोबांचे स्वप्न नातवाने पूर्ण केले
वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलगा प्रयत्न केल्याचे आपण ऐकले असेल. परंतु, बिहारमधील सहरसा येथील शिवम टेकरीवाल या तरुणाने आपले आजोबा केदार टेकरीवाल यांचे स्वप्न पूर्ण केले. शिवमच्या आजोबांनी आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी परीक्षाही दिली होती. परंतु, त्यांना यश आले नाही. परंतु, त्यांचा नातू शिवमने यूपीएससी उत्तीर्ण करत देशात 740 की रँक मिळवली आहे. शिकमने पाचव्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. शिवमने यूपीएससी परीक्षा पास केल्याने त्याचे संपूर्ण गावकऱयाने कौतुक केले आहे.