Kalki 2898 AD : ‘कल्कि 2898 एडी’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात 200 कोटींची कमाई

नाग अश्विन यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटाचा सध्या तिकीटबारीवर हवा पहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासून हा चित्रपट तुफान चालत आहे. प्रभास आणि दीपिका पदुकोन यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतला आहे. याच चित्रपटात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका करत सर्वांचे मन जिंकले. दिग्गज कलाकारांची मांदियाळी असणाऱ्या या चित्रपटाने कमाईही मजबूत केली आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 95 कोटींचा गल्ला जमवला होता. यानंतर शुक्रवारी या चित्रपटाच्या कमाईला थोडा ब्रेक लागला आणि या चित्रपटाने 57.6 कोटींचा गल्ला जमवला. अर्थात दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाली असली तरी कलेक्शनच्या बाबतीत या ‘कल्कि 2898 एडी’ चित्रपटाने जवान, गदर-2 आणि बाहुबली-2 सारख्या सुपरहिट चित्रपटांनाही मागे सोडले.

तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाने पुन्हा एकदा मार्केट जाम केले असून जवळपास सर्व शो हाऊसफुल्ल जात आहेत. विकेंड असल्याने प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली. यामुळे शनिवारी या चित्रपटाने 67.1 कोटींची कमाई केली. तीन दिवसात ‘कल्कि 2898 एडी’ चित्रपटाचा कमाईचा आकडा 200 कोटींच्या पार गेला आहे.

दरम्यान, हा फक्त हिंदुस्थानमध्ये विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या कमाईचा आकडा असून विदेशातही या चित्रपटाचा डंका वाजत आहे. तिथे कमाईचा आकडा 298.5 कोटींवर पोहोचला असून रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने यात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Box Office Flops 2024 : नाव मोठं, लक्षण खोटं! पहिल्या 6 महिन्यात ‘या’ चित्रपटांचा तिकीटबारीवर निघाला घाम, फ्लॉपचा शिक्का बसला

काय आहे कथा?

‘कल्कि 2898 एडी’ चित्रपटाच्या कथेचा मूळ धागा भगवान विष्णूच्या आधुनिक अवताराभोवती फिरणारा आहे. भगवान विष्णू जगाला वाईटापासून वाचविण्यासाठी दहावा अवतार घेणार आहेत आणि तो अवतार कल्की असणार आहे यावर हे कथानक आधारलेले आहे. भगवान श्रीकृष्ण द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामाला अमरत्व प्रदान करतात. पौराणिक आख्यायिकेनुसार अश्वत्थामा कलियुगाच्या अंतापर्यंत जिवंत राहणार असतो. ज्यावेळी पृथ्वीवर अमानुष अत्याचार, हिंसाचार वाढेल त्यावेळी भगवान विष्णू दहावा अवतार धारण करतील आणि कलियुगाचा अंत होईल अशी आख्यायिका मानली जाते. ही सर्व गुंतागुंत यात दाखवली असून अमिताभ बच्चन, कमल हसन, प्रभास, दीपिका पदुकोन आदी कलाकारांच्या लाजबाब अभिनयाने या चित्रपटाला चार चांद लावलेले आहेत.