90 दिवसांत चार्जशीट दाखल न केल्यानेच आधीच्या पोक्सो गुन्ह्यात नराधम गवळीला जामीन, मनोरुग्ण असल्याचा बनाव

कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करून तिची निघृण हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळीच्या क्रूरतेबद्दल सर्वत्र प्रचंड संताप आहे. याआधी दोन पोक्सो गुन्हे दाखल असतानाही तो जामिनावर मोकाट होता. पोक्सो गुन्ह्यात जामीन मिळत नाही. मात्र राजकीय दबावामुळेच तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी ढिलाई केली आणि पोलिसांनी 90 दिवसांत चार्जशीट दाखल केली नाही. कायद्यातील ही पळवाट शोधून त्याने जामीन मिळवल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. त्यामुळे गवळी मनोरुग्ण असून त्या आधारेच त्याला जामीन मिळाला हा केवळ बनाव असल्याचे वास्तव समोर आले आहे.

कोळसेवाडी येथील 13 वर्षांच्या निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्यानंतर नराधम गवळीचे अनेक घृणास्पद कारनामे आता बाहेर येत आहेत. गवळीवर यापूर्वीच्या गुन्ह्यांत वेळीच चार्जशीट दाखल केली असती तर मुलीचा जीव वाचला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया युवा सेनेचे शहर अधिकारी अॅड. नीरज कुमार यांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे 2016, 2021 आणि 2023 मध्ये कोळसेवाडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. यातील दोन गुन्हे पोक्सोचे आहेत.

पोक्सोमध्ये सहजासहजी जामीन मिळत नाही. मात्र गवळी गुन्हा दाखल झाला तरी जामिनावर मोकाट होता. बोगस मनोरुग्ण दाखल्याच्या आधारे तो जामिनावर सुटल्याची चर्चा होती. मात्र हा केवळ बनाव असल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे. कल्याण, ठाणे, मुंबईतील शासकीय रुग्णालयांमधून पोलिसांना याबाबत कुठलीही सत्यता अद्यापपर्यंत मिळालेली नाही. केवळ कठोर शिक्षेतून वाचण्यासाठी गवळीच्या साथीदारांनी मुद्दामहून तो मनोरुग्ण असल्याची खोटी माहिती पसरवली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या तपासाबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

अल्पवयीन मुलेच का टार्गेट?

विकृत गवळीने कोळसेवाडी, चक्की नाका, नंदादीप परिसरात अनेक अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार केले. चिमुकल्यांचे शोषण केल्याप्रकरणी तीन गुन्हेही दाखल झाले. पोक्सो दाखल झाल्यानंतर तीन महिन्यांत चार्जशीट दाखल करणे पोलिसांचे कर्तव्य होते. मात्र गवळीच्या डोक्यावर हात असलेल्या एका राजकारण्यामुळे चार्जशीट दाखल करताना हलगर्जीपणा दाखवला गेला. त्यामुळेच हैवान जामिनावर सुटायचा आणि पुन्हा चिमुकल्यांना शिकार बनवायचा. आता मात्र पोलिसांनी त्याच्याभोवती घट्ट फास आवळायला सुरुवात केली आहे. गवळी अल्पवयीन मुलेच का टार्गेट करायचा, त्याच्या विकृतीमागे काय कारण आहे, याचा शोधही पोलीस घेत आहेत.