
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशाअभावी गरोदर महिलेवर उपचार नाकारल्याची घटना ताजी असतानाच जालन्यातील एका खासगी रुग्णालयाने सोळा वर्षांच्या मुलीवरील उपचारांचे तब्बल तीन लाख रुपयांचे बिल माफ करून माणुसकीचे दर्शन घडवले. यामुळे मुलीला जीवदान मिळाले आहे.
बुलढाणा जिह्यातील सिंदखेडराजा परिसरातील एका गावात उसाच्या रसाच्या गुऱ्हाळात केस अडकून 16 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गावचे सरपंच निवृत्ती कठोरे यांनी तत्काळ पुढाकार घेत मुलीला जालना येथील कलावती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाने माणुसकी दाखवत त्वरित उपचार सुरू केले. औषध व उपचारांसाठी पैसे नसल्याची माहिती मिळताच ‘समाजभान’ या सामाजिक संस्थेने तात्काळ आर्थिक मदत केली. समाजमाध्यमांद्वारे ही घटना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्यापर्यंत पोहोचली. मुलीच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी अवघ्या दोन तासांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची तातडीची मदत मंजूर केली.
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी
वडिलांच्या अकाली निधनानंतर या 16 वर्षीय मुलीने कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. तिच्या 19 वर्षीय मोठ्या बहिणीला स्पर्धा परीक्षेची तयारी आणि नऊ वर्षीय भावाला शालेय शिक्षणासाठी प्रेरणा देत ती स्वतः गावातील बसस्थानकावर उसाच्या रसाच्या दुकानाचा व्यवसाय करत होती. आईच्या मदतीने कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या मुलीवर आलेल्या संकटाने सर्वांचे मन सुन्न झाले होते. वेळीच मिळालेल्या उपचार आणि आर्थिक मदतीमुळे तिला नवजीवन मिळाले.