
नाशिकच्या काळाराम मंदिरातील मूर्ती पूजेसाठी तेथील पुजाऱ्यांना दर महिन्याला रोख पैसे दिले जातील, अशी हमी मंदिर विश्वस्तांनी उच्च न्यायालयात दिली. पुजाऱ्यांना दर महिन्याला 21 हजार रुपये दिले जातील, असा ठराव 14 एप्रिल 2025 रोजी मंजूर करण्यात आला. ही रक्कम या महिन्यापासूनच दिली जाईल, असेही ठरले असल्याची माहिती श्री काळाराम मंदिर संस्थान ट्रस्टने न्यायालयाला दिली. त्याची नोंद करून घेत न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने याप्रकरणी दाखल झालेली याचिका निकाली काढली. पुढील ठराव होईपर्यंत ही रक्कम पुजाऱ्यांना द्या, असेही न्यायालयाने ट्रस्टींना सांगितले आहे.
काय आहे प्रकरण
नरेश पुजारी व अन्य यांनी ही याचिका केली होती. 23 नोव्हेंबर 1977 रोजी जिल्हा न्यायालयाने दैनंदिन पूजेबाबत निकाल दिला. पुजाऱ्यांनी काळारामाची दररोज पूजा करावी. पूजेचा खर्च ट्रस्टीने द्यावा, असे या निकालात नमूद करण्यात आले होते. पूजेचा खर्च दररोज देणे शक्य नव्हते. पूजेसाठी महिन्याला 11 हजार रुपये पुजाऱ्यांना देण्याचा ठराव ट्रस्टींनी 17 मार्च 2002 रोजी मंजूर केला. दहा वर्षांनी 2012 मध्ये ही रक्कम वाढवून 20 हजार रुपये करण्यात आली. 2016 मध्ये या रक्कमेत एक हजार रुपयांची वाढ करून 21 हजार रुपये करण्यात आली. जानेवारी 2020 पासून ट्रस्टीने हे पैसे देणे बंद केले. त्याविरोधात ही याचिका करण्यात आली होती.
पुजाऱ्यांना मिळणार 19 लाखांची थकबाकी
2020 पासून पुजाऱ्यांना पूजेचे पैसे देणे ट्रस्टने बंद केले होते. या थकबाकीची बेरीज करून संबंधित रक्कम कोर्टात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने ट्रस्टला दिले होते. त्यानुसार ट्रस्टने 19 लाख 79 हजार 775 रुपये न्यायालयात जमा केले होते. हे पैसे पुजाऱ्यांना देण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.