हिंदुस्थान व चीनमध्ये 2020 ला झालेल्या डोकलाम संघर्षानंतर थांबवण्यात आलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. चीन व हिंदुस्थान या दोन्ही देशांमध्ये झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच या यात्रेसाठी दोन्ही देशांमध्ये डायरेक्ट फ्लाईट सुरू करण्यात येणार असल्याचे देखील ठरले आहे.
हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे रविवारी दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कैलास मानसरोवर यात्रेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला.
कैलास यात्रेसाठी आता फक्त 16 दिवस लागणार
कैलास मानसरोवर यात्रा मे महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता असून ही यात्रा आता फक्त 16 दिवसांत पूर्ण करता येऊ शकणार आहे. याआधी कैलास यात्रेला तब्बल 22 दिवस लागत असायचे. पिथौरागड ते लिपुलेख खिंडीत जाण्यासाठी 12 दिवस लागायचे, आणि उरलेले दहा दिवस तिबेटमध्ये जायचे. आता प्रवाशांना उत्तराखंडमध्ये 6 तर तिबेटमध्ये 10 दिवस लागतील. यामुळे भाविकांच्या प्रवासात 6 दिवसांची बचत होणार आहे. ये-जा आणि प्रवासासाठी प्रत्येकी 3 दिवस लागणार आहेत.