
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 क्रिकेट मालिकेत ऋतुराज गायकवाड हा सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला होता. मात्र, तरीही श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी हिंदुस्थानच्या 15 सदस्यीय संघात महाराष्ट्राच्या ऋतुराजला संधी मिळाली नाही. त्यामुळे ‘बीसीसीआय’च्या समितीचे माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत हे चांगलेच भडकले. त्यांनी संघ निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत. शुभमन गिलला उपकर्णधारपद दिल्याबद्दलही श्रीकांत यांनी ‘प्रत्येकाचं नशीब शुभमन गिलसारखं नसतं’, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले.
‘बीसीसीआय’ने गुरूवारी श्रीलंका दौऱ्यासाठी हिंदुस्थानच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. मात्र, यामध्ये ज्याच्याकडे ‘लंबी रेस का घोडा’ म्हणून बघितले जाते त्या ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली नाही. झिम्बाब्वे दौऱ्यावर लक्ष्यवेधी कामगिरी केल्यानंतरही ऋतुराजला डावलल्याने बोर्डाच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
कृष्णमाचारी श्रीकांत आपल्या यू- ट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले की, ‘ऋतुराज गायकवाड़ची कामगिरी पाहाता टी-20 संघात निवड होणं स्वाभाविक होतं. मात्र, तसं झालं नाही. त्यामुळे आता ऋतुराजने अधिक धावा केल्या पाहिजेत, ज्यामुळे निवड समितीला त्याच्या नावाचा विचार करावाच लागेल. कारण प्रत्येकाचे नशीब शुभमन गिलसारखे नसते,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
View this post on Instagram
ऋतुराज गायकवाडने झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत दमदार कामगिरी केली. त्याने चार सामन्यांच्या तीन डावांत 158.33 च्या स्ट्राइक रेटने एकूण 133 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या या फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 77 धावा होती.