दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेत लाखो भाविक रणरणत्या उन्हातही तल्लीन; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गगनचुंबी सासनकाठ्यांची मिरवणूक

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेशसह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची आज चैत्र पौर्णिमा यात्रा लाखो‌ भाविकांच्या मांदियाळीत पार पडत आहे. यासाठी जोतिबा डोंगरावर शुक्रवारपासूनच तब्बल पाच लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. यात्रेच्या मुख्य दिवशी पारंपारिक वाद्यांच्या तालावर उंचच उंच सासनकाठ्या नाचवत, गुलाल खोब-यांची मुक्त उधळण करत, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या अखंड जयघोषात अबालवृद्ध भाविक रणरणत्या उन्हाची पर्वा न करता तल्लीन झाले होते.

यात्रेच्या आज मुख्य दिवशी पहाटे तीन वाजता घंटानाद होऊन,धार्मिक विधीला सुरूवात झाली. पहाटे पाच वाजता शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाभिषेक महापूजा तर 10 वाजता धुपारती सोहळा पार पडला.दुपारी एकच्या सुमारास पालकमंत्री प्रकाश आबीटकर तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत मानाच्या सासनकाठींच्या मिरवणुकीस सुरुवात झाली.तर हस्तनक्षत्रावर सांय 5.30 वाजता श्री जोतिबाचा पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने होणार आहे.

तीन दिवसांच्या यात्रेतील आजचा मुख्य दिवस असून पहाटे 3 वाजता घंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन हे विधी संपन्न झाले. पहाटे 5 वाजता शासकीय महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवाची पारंपारिक राजदरबारी बैठी अलंकार महापूजा बांधण्यात आली. दुपारी एकच्या सुमारास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचे पूजन होऊन, देवस्थान कमिटीचे म्हालदार, चोपदार व तोफेच्या सलामीने सासनकाठीच्या मिरवणुकीस सुरुवात झाली .यासाठी मानाच्या 108 सासनकाठ्या जोतिबावर दाखल झाल्या असून चांगभलंच्या गजराने अवघा डोंगर दुमदुमून गेला आहे.

सलग सुट्टी तसेच प्रवासाची सोय आणि ठीक ठिकाणी अन्नछत्राद्वारे मोफत अन्नाची सुविधा पाहता, दरवर्षी भाविकांच्या गर्दीत वाढ होताना दिसत आहे.यंदाही सुमारे 10 ते 12 लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज असून यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आवश्यक ती तयारी केली आहे.

ठिकठिकाणी पोलीस तसेच सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोनद्वारे गर्दीवर नजर ठेवण्यात येत असून डोंगरावर ये जा करण्यासाठी अनेक वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक सेवा, संस्थांच्यावतीने ठिकठिकाणी मोफत अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले असून एसटी महामंडळाच्यावतीने 24 तास बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे.