अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना उघडपणे पाठिंबा देणारे अमेरिकेतील बिजनेसमॅन आणि टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी आता आपला मोर्चा कॅनडा निवडणुकीकडे वळवला आहे. कॅनडाच्या निवडणुकीत जस्टीन टडो यांचा दारुण पराभव होईल, अशी भविष्यवाणी एलन मस्क यांनी केली आहे. जर्मनीचे सरकार पडल्यानंतर एका युजरने पोस्ट केली होती की, कॅनडाला टडोपासून सुटका मिळावी यासाठी मस्क यांनी मदत करायला हवी. यावर स्वतः मस्क यांनी पुढे येत कॅनडात टडो सरकारचा पराभव होईल, असे म्हटले आहे. जर्मनीतील सरकार कोसळल्यावरून मस्क यांनी चान्सलर शॉल्स यांची खिल्ली उडवली आहे. शॉल्ज ही मुर्ख व्यक्ती आहे, असेही मस्क म्हणाले. जर्मनीत चान्सलर यांनी आपल्याच सरकारमधील अर्थ मंत्री क्रिस्टियान लिंडनर यांना पदावरून हटवले. लिंडनर हे फ्री डेमोक्रॅटिक पार्टी (एफडीपी) चे नेते आहेत. जे शॉल्ज सरकारला पाठिंबा देत होते. एफडीपीने पाठिंबा काढल्यानंतर शॉल्ज यांचे सरकार अल्पमतात आले आहे.
जर्मनी आर्थिक संकटात
रशिया आणि युक्रेन या दोन देशांच्या युद्धात युक्रेनची मदत केल्याने जर्मनीची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. अमेरिकेनंतर जर्मनी युक्रेनची सर्वात जास्त आर्थिक मदत करत आहे. जर्मनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चान्सलर आर्थिक संस्थेकडून जास्त कर्ज घेणार होते. परंतु याला अर्थमंत्र्यांनी विरोध दर्शवला. खर्चात कपात करावी, असे त्यांचे म्हणणे होते. अर्थमंत्र्यांनी कर्ज घेण्यास परवानगी न दिल्याने चान्सलर शॉल्सने लिंडनर यांना पदावरून हटवले.