कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना झटका; खलिस्तान समर्थक NDP ने पाठिंबा काढल्याने सरकार कोसळण्याची शक्यता

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून हिंदुस्थानवर आरोपांच्या फैरी झाडणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना मोठा धक्का बसला आहे. खलिस्तान समर्थक एनडीपीने ट्रूडो यांच्या सरकारला दिलेला पाठींबा काढून घेतला आहे. एनडीपी नेते जगमीत सिंग यांनी याची घोषणा केली. यामुळे ट्रूडो यांचे सरकार अल्पमतात आले असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.

एनडीपीने बुधवारी दुपारी एक व्हिडीओ शेअर करत जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारचा पाठिंबा काढत असल्याची घोषणा केली. लिबरल पक्षाची लोकं कमकूवत आणि स्वार्थी झालेले असून कॅनडाच्या लोकांसाठी ते लढू शकत नाहीत. ट्रूडो सरकारने लोकांना निराश केले असून कॅनडाच्या लोकांकडून आणखी एक संधी मिळण्याची त्यांची लायकी नाही, असे एनडीपी नेते जगमीत सिंग यांनी म्हटले.

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून एनडीपीमध्ये याबाबत चर्चा सुरू होती. बुधवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास पंतप्रधान कार्यालयाला माहिती देण्यात आली. त्यानंतर 12.55 वाजता जगमीत सिंग यांनी व्हिडीओ शेअर केला. यामुळे ट्रूडो यांचे सरकार अल्पमतात आले असून कोणत्याही क्षणी कोसळू शकते.

जस्टीन ट्रूडो यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये पहिल्यांदा कॅनडाचे पंतप्रधान म्हणून कारभार स्वीकारला. त्यानंतर 2022 मध्ये एनडीपी आणि ट्रूडो सरकारमध्ये करार झाला. जून 2025 पर्यंतचा हा करार होता. अल्पमतातील सरकार टिकवण्यासाठी हा करार करण्यात आला होता. मात्र आता हा करार एनडीपीने मोडला असून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅनडामध्ये पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये सध्या सत्तेत असणारी लिबरल पार्टी विरोधातील कंजर्वेटिव्ह पार्टीचा सामना करू शकणार नाही असे संकेत मिळत आहेत. आगामी निवडणुकीमध्ये कंजर्व्हेटिव्ह पार्टी सत्तेत येण्याची शक्यता आहे. याचाही अंदाज घेत एनडीपीने ट्रूडो यांची साथ सोडल्याची शक्यता आहे.