
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या तुगलक क्रिसेंट येथील निवासस्थानी आज सरन्यायाधीशांनी नेमलेली त्रिसदस्यीय समिती चौकशीसाठी पोहोचली. या समितीने वर्मा यांच्या घराची 45 मिनिटे झाडाझडती घेतली. समितीने ज्या खोलीत 500 रुपयांच्या नोटांच्या अर्धवट जळालेल्या पाच गोण्या सापडल्या त्या खोलीची तपासणी केली.
चौकशी समितीत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी एस संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यालयाच्या मुख्य न्यायाधीश अनु शिवरामन यांचा समावेश आहे.
अलाहाबाद बार असोसिएशनचे आंदोलन
न्यायमूर्ती वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ठेवला आहे. या प्रस्तावाला अलाहाबाद बार असोसिएशनने कडाडून विरोध केला. आज अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर वकिलांनी जोरदार निदर्शने केली.