न्यायमूर्ती संजीव खन्ना उद्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारणार

देशाचे मावळते सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांना शुक्रवारी, 8 नोव्हेंबरला निवृत्तीपर निरोप देण्यात आला. अधिकृतरीत्या त्यांचा कार्यकाळ रविवारी संपला. शनिवार आणि रविवार हे दोन्ही न्यायालयीन कामकाजाच्या सुट्टीचे दिवस. त्यामुळे डॉ. चंद्रचूड यांचा शुक्रवारी शेवटचा कामकाजाचा दिवस होता. त्यांच्या जागी न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सोमवारी सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. ते देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायिक सेवा देणार आहेत.

डॉ. चंद्रचूड यांच्यानंतर न्यायमूर्ती खन्ना हे सर्वात सिनिअर होते. त्यामुळे त्यांना नवीन सरन्यायाधीश बनण्याचा बहुमान मिळाला आहे. ते 13 मे 2025 पर्यंत सरन्यायाधीश म्हणून कार्यरत राहणार आहेत. अर्थात त्यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाल सहा महिन्यांचा असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते कामकाजाच्या पहिल्या दिवसांपासूनच अधिक व्यस्त राहणार आहेत. उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयासाठी निवड केल्या जाणाऱ्या न्यायमूर्तींमध्ये वैविध्य आणण्यावर त्यांचे लक्ष असेल. त्याचबरोबर प्रलंबित प्रकरणांचा वेळीच निपटारा करण्याच्या मुख्य प्रश्नाकडेही त्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्य यांसारखी प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढली जाण्याची आशा आहे.

1960 मध्ये कायदे क्षेत्रातील प्रतिष्ठित कुटुंबात न्यायमूर्ती खन्ना यांचा जन्म झाला असून त्यांचा कनिष्ठ न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास गौरवास्पद राहिला आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून विधी शाखेची पदवी घेतल्यानंतर 1983 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये दाखल होऊन करिअरची सुरुवात केली होती. संजीव खन्ना यांनी चार्टर्ड अकाउंट म्हणून करिअर करावे, अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. मात्र त्यांनी कायदा विषयाला पसंती दिली आणि अंतिमतः हिंदुस्थानच्या कायदे इतिहासात स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले.