कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखान्यातील कर्मचाऱयाला न्याय; भारतीय कामगार सेनेच्या दणक्यानंतर प्रशानाकडून निलंबन मागे

कोणतीही पूर्वसूचना न देता कांदिवली पश्चिम येथील सचिन तेंडुलकर जिमखान्यातील एका कर्मचाऱयाचे प्रशासनाकडून तडकाफडकी निलंबन करण्यात आले होते. परंतु, भारतीय कामगार सेनेच्या दणक्यानंतर प्रशासन ताळ्यावर आले असून या कर्मचाऱयाचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. याबद्दल या कर्मचाऱयाने शिवसेना तसेच भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.

गेल्या आठ वर्षांपासून सचिन तेंडुलकर जिमखान्यात (एमसीए) एकनाथ दुर्गवले कार्यरत आहेत. अचानक 2 जुलै रोजी प्रशासनाकडून त्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. आपल्याला न्याय मिळावा यासाठी दुर्गवले यांनी भारतीय कामगार सेनेकडे धाव घेत आपली व्यथा मांडली. त्यानंतर भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस सचिन अहिर यांच्या आदेशाने भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मनोज धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चिटणीस योगेश आवळे, प्रशांत नाईक, अभय प्रभू यांच्या सहकार्याने भारतीय कामगार सेनेतर्फे प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

…तर कायदेशीर लढा लढू
– एकनाथ दुर्गवले यांचे निलंबन तत्काळ मागे घ्या…अन्यथा तुमच्याविरोधात कायदेशीर लढा लढू, असा इशारा भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मनोज धुमाळ यांनी जिमखान्याचे व्यवस्थापक तेजस थोरात यांना पत्राद्वारे दिला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने दुर्गवले यांना पुन्हा कामावर रुजू होण्यासंदर्भात 4 जुलै रोजी पत्र दिले. यानिमित्ताने भारतीय कामगार सेनेची जोरदार कामगिरी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.