सुप्रीम कोर्टासारखं बेशिस्त न्यायालय पाहिलं नाही! न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आसुड

माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्यावर पद व अधिकारांचा दुरुपयोग, भ्रष्टाचार, निवडक राजकीय पक्ष व नेत्यांवर मेहेरबानी यांसारखे गंभीर आरोप झाले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिमेला धक्का बसला असतानाच गुरुवारी दस्तुरखुद्द भावी सरन्यायाधीश, न्यायमूर्ती भूषण गवई यांनी न्यायालयीन कार्यपद्धतीवर सडेतोड टीका केली. सुप्रीम कोर्टासारखे बेशिस्त न्यायालय मी कुठेही पाहिलं नाही, अशा शब्दांत त्यांनी आसुड ओढला.

न्यायालयात विशिष्ट प्रकरणावर चर्चा सुरू असताना मधेच तोंड खुपसण्याच्या वकिलांच्या प्रवृत्तीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणीही कोठूनही उठतो व आपलेच तुणतुणे वाजवतो. सर्वोच्च न्यायालयातील चर्चेला योग्य सूरच नसतो. मुंबई उच्च न्यायालयात असे वर्तन कधीही पाहिले वा ऐकायला मिळालेले नाही. न्यायालयाच्या प्रतिष्ठsला धक्का बसता कामा नये याची काळजी सर्व वकिलांनी घेतलीच पाहिजे, असेही न्यायमूर्ती गवई यांनी बजावले.

गेल्या वर्षीही अनागोंदी कारभारावर केले भाष्य

न्यायमूर्ती गवई यांनी गेल्या वर्षीही सर्वोच्च न्यायालयातील अनागोंदी कारभारावर भाष्य केले होते. आमच्यासारखे जे उच्च न्यायालयातून इथे येतात, त्यांना सर्वोच्च न्यायालय अत्यंत बेशिस्त न्यायालय असल्याचे प्रकर्षाने जाणवते. व्यवस्थेचा अभाव स्पष्टपणे दिसतो, अशी टिप्पणी न्यायमूर्ती गवई यांनी केली होती.

गवई चार महिन्यांनी बनणार सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयातील व्यवस्थेवर सडेतोड भाष्य करणारे न्यायमूर्ती गवई हे चार महिन्यांनी मे 2025 मध्ये सरन्यायाधीश बनणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती गवई यांच्याकडे सरन्यायाधीशपदाची सूत्रे येणार आहेत. ते अनुसूचित जाती प्रवर्गातील दुसरे सरन्यायाधीश ठरणार आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती के. जी. बालकृष्णन हे अनुसूचित जातीतील पहिले सरन्यायाधीश बनले होते.

– मी यापूर्वी मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर खंडपीठात न्यायदानाचे काम केले आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयासारखे बेशिस्त न्यायालय कुठेही पाहिले नाही. इथल्या कारभारात अजिबात शिस्त नाही. इथे एका बाजूला सहा वकील आणि दुसऱया बाजूला सहा वकील एकमेकांवर एकाच वेळी ओरडतात. युक्तिवाद करण्याची शिस्तच पाळली जात नाही, असे न्यायमूर्ती गवई म्हणाले.