
मंगळवारी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती गवई 14 मे रोजी हिंदुस्थानचे पुढील सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. कायदा मंत्रालयाने मंगळवारी एक अधिसूचना जारी करून न्यायमूर्ती गवई यांची देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती जाहीर केली. याआधी विहित प्रक्रियेनुसार, 16 एप्रिल रोजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केंद्र सरकारकडे न्यायमूर्ती गवई यांच्या नावाची शिफारस केली होती. सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपत आहे.
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “हिंदुस्थानातील संविधानात दिलेल्या अधिकारांचा वापर करून, मला 14 मे 2025 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करताना आनंद होत आहे.”