जंक फूड की पोषक आहार! तुमची आवड काय?

खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.. मराठीतील ही प्रचलित म्हण आपण सर्वांनीच ऐकलेली आहे. त्याच धर्तीवर आधारीत आता सध्या एक ट्रेंड सुरु आहे तो म्हणजे हेल्दी इज एक्सपेन्सिव्ह… पोषक आहार हा महाग आहार म्हणून ओळखला जात आहे.

सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये आपण स्वतःकडे नीट पाहिल्यास, आपल्या लक्षात येईल की आपण जंक फूडच्या आहारी गेलोय. जंक फूडच्या या काळात एकीकडे पोषक आहाराकडे मात्र आपण दुर्लक्ष करत आहोत. आपण जे खातो त्याचा आपण सखोल अभ्यास केला तर, आपल्या लक्षात येईल की खरोखरच आपण पोषक आहार खातोय का हा प्रश्न स्वतःला विचारुन बघा. याचे उत्तर अनेकांचे हे नाही असेच आहे.

बाजारात प्रचलित असलेल्या कंपन्या आपल्याला एका क्लिकवर दारात पदार्थ आणून देतात. अन्नपदार्थ घरपोच मिळत असल्यामुळे तात्पुरती सोय होते, त्यामुळेच पोषक घटकांशी आपला दुरान्वये संबंध राहिला नाही. पूर्वीच्या काळी अनेकजण हातसडीचा तांदूळ खायचे आज मात्र आपल्या आहारात असलेला चकचकीत शुभ्र तांदुळ आपल्या आरोग्यावर काय परीणाम करतो याचा आपण विचारही केलेला नाही.

सध्याच्या घडीला बाजारात काही मोजक्या ठिकाणी चांगल्या वस्तू मिळतील. भले या वस्तूंची किंमत जास्त असेल, परंतु यातील पोषण मूल्यांची मात्रा ही शरीरास पूरक असते हे विसरून चालणार नाही. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांमध्ये ब्रेड हा आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. हाच ब्रेड घेताना ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेड असे दोन पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतात. असे असतानाही आपण केवळ किंमतीकडे बघून व्हाईट ब्रेडची निवड करतो. ब्राऊन ब्रेड हा तुलनेने महाग असल्याकारणाने या ब्रेडची मागणी तुलनेने नक्कीच कमी आहे.

क्विक बाईटच्या नावाखाली बाजारात उपलब्ध असलेले अनेक पर्याय आपल्याला दिसतात. अदमासे ५ रुपयांपासून मिळत असलेली ही उत्पादने लहानांसह मोठेही अगदी आवडीने खातात. पण त्यातून आपल्या शरीराला आवश्यक काय मिळतं याचा मात्र आपण तीळमात्र विचार करत नाही. तर याच्याच दुसरं टोक म्हणजे मखाणा… मखाणा खाणं हे शरीराच्या दृष्टीने खूप हितावह असले तरी, एकूणच मखाणाची किंमत पाहता या पदार्थाकडे कानाडोळा झालेला पाहायला मिळतो. रेडी टू इटच्या या जमान्यात आपण फळे कापून खाण्यापेक्षा फळाचं ज्यूस पिणं हे अधिक पसंत करतो.
असं म्हणतात की, आपलं लाईफस्टाइल हाच आपल्या शरीराचा आरसा आहे. परंतु आपलं बदलत असलेले हे खाण्याचे ट्रेंडस् खरंच आपल्याला रोगी करणार आहेत की, निरोगी ठेवणार आहेत हे ज्याचं त्याने आता जाणून घेणं गरजेचं आहे.
भविष्यात खाण्यावर खर्च करताना पोषण मूल्य बघायची, की केवळ जिभेची तात्पुरती चव ही निवड सर्वस्वी आपलीच  असणार आहे.